महाराष्ट्रातील 3 हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय अर्थसंकल्प : 2023-24 च्या पूर्व बैठकीत विविध महत्वपूर्ण मागण्या
Edited by: देवयानी वरसकर
Published on: November 25, 2022 19:55 PM
views 247  views

नवी दिल्ली : लोहखनिज यावरील अबकारी करात  (एक्साईज ड्युटी) केलेली वाढ मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. यासंदर्भातील मागणी यापुर्वी त्यांनी पत्र पाठवून केलेली होती. विपुल खनिज संपदा असलेल्या कोकणासारख्या क्षेत्राच्या अर्थकारणाला त्याचा मोठा लाभ होईल. यामुळे खणिकर्म आणि संलग्न उद्योगांना चालना मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. केंद्रीय अर्थसंकल्प पूर्व बैठकीवेळी ते बोलत होते.


भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य वर्ष 2021-22 च्या 15 हजार कोटींहून आर्थिक वर्ष 2022-23 साठी 1 लाख कोटी रुपये इतके वाढवून मिळालेले आहे. महाराष्ट्र शासनाने सुमारे 3000 कोटी रुपयांचा अतिरिक्त प्रकल्पांसाठीचा प्रस्ताव सादर केलेला आहे, यास मंजुरी प्रदान करण्यात यावी. यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.


येथील मानेकशॉ सेंटरमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेत केंद्रीय अर्थसंकल्प : 2023-24 ची  पूर्व बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत श्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय राज्य अर्थ मंत्री डॉ. भागवत कराड, पंकज चौधरी यांच्यासह विविध राज्यांचे वित्तमंत्री तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


श्री फडणवीस पुढे म्हणाले, वर्ष 2017-18 ते वर्ष 2020-21 या आर्थिक वर्षांतील वस्तु व सेवा कर (जीएसटी) ची भरपाई  महाराष्ट्राला प्राप्त झाली आहे. वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षासाठी तसेच वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीसाठी हंगामी भरपाई प्राप्त मिळाली आहे. याबद्दल केंद्राचे आभार त्यांनी मानले. उर्वरित कालावधीसाठी नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांकडून (सीएजी) प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी बैठकीत  सांगितले.


राज्यात प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेची अतिशय चांगली सुरूवात आहे, असे सांगत लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आगामी अर्थसंकल्पात आर्थिक सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी श्री फडणवीस यांनी केली. केंद्रीय भविष्य निर्वाह निधीत योगदानासाठी आर्थिक सहाय्य करता आले तर सुक्ष्म, लघु, मध्यम  (एमएसएमई) क्षेत्रात रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण होतील, असे श्री फडणवीस यावेळी म्हणाले.

मोठ्या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नाही यासाठी केंद्र शासनाच्या स्तरावर योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी करत याचा लाभ महाराष्ट्र सह इतर राज्यांनाही होईल, असे श्री फडणवीस म्हणाले.

हवामान बदलांच्या प्रश्नावर भारताची प्रतिबद्धता अधिक दृढ करण्यासाठी नॅशनल डिटरमाईंड कॉन्ट्रिब्युशन (एनडीसी) ला मंजुरी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानत, आगामी अर्थसंकल्पात स्वच्छ ऊर्जा  (क्लिन एनर्जी) उद्योगांसाठी करांमध्ये काही सवलती आणि प्रोत्साहनपर योजना असाव्यात, अशी विनंती श्री फडणवीस यांनी यावेळी  केली.