सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात येत आहेत. ४ डिसेंबरला त्यांच्या उपस्थितीत नौसेना दिन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रेमीन नरेंद्र मोदींना लिहिलेल पत्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सावंतवाडी टर्मिनस प्रेमी सिंधुदुर्गवासियाचे अनावृत्त पत्र
प्रति,
श्री. नरेंद्रजी मोदी यांस,
स. न. वि. वि.
पत्रास कारण की, येत्या चार डिसेंबर रोजी आपले पदस्पर्श आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या भूमीला लागत आहेत. निमित्त आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील नौदलाच्या सोहळ्याचे. शिव छत्रपतींच्या अस्तित्वाचा पुरावा जपणारा आणि मंदिरात देव म्हणून त्यांची पूजा करणारा आमचा हा सिंधुदुर्ग. अशा या पावन भूमीत आपले आणि आपल्या भारतभूमीच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे जिल्हा वासियांच्या वतीने सर्वप्रथम हार्दिक स्वागत. घरात असेल नसेल तरी असलेल्या जिन्नसातून सर्वोत्तम पाहुणचार करायची आमची परंपरा आहे. त्यामुळे चार तारीखच्या स्वागतात काहीही कमी पडणार नाही याची खात्री सर्वांनाच आहे.
आता मुख्य मुद्दा. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो त्याच सह्याद्रीच्या कुशीत आम्ही आजपर्यंत संपन्न आणि शांत आयुष्य जगत आलोय. झालाय तोच विकास अशीच भोळी आशा घेऊन. मग, स्वप्न पडलं ते कै. मधु दंडवते यांना वास्तविक विकासाचे कोकणरेल्वेचे. परमेश्वर कृपने आणि आमच्या सौभाग्याने झुक झुक गाडी अंगणातून धावू लागली आमच्या. कै. मधु दंडवते, कै. नाथ पै, कै. जॉर्ज फर्नांडिस आणि इ. श्रीधरन यांच्या स्वप्नातील आमची कोकणरेल्वे आमच्या जिल्ह्यातून धावू लागली. आमच्या जमिनी, आमची घरे, आमची मंदिरे जे जे काही अर्पण करू शकलो ते ते जा देशसेवेसाठी स्वाहा केलंय आम्ही. पण त्याबदल्यात आम्हाला मिळालाय तो मोठ्ठा शून्य, हो शून्य.
दिवा - सावंतवाडी पेसेंजर ट्रेन आणि तुतारी ही कायमच उशिरा येणारी तथाकथित एक्सप्रेस हीच आमच्या जिल्ह्याची संपत्ती. बाकी सर्व फक्त आमच्या उरावरून धावण्यासाठीच का ? आम्ही एवढे हे योगदान दिलंय? मिळेल काय याचं उत्तर?
'राष्ट्रप्रथम' या ब्रिदाने आम्ही सुद्धा गेली चोवीस वर्षे जगुन बघितलंय. पण त्याबदल्यात आपल्या मायबाप सरकारने आणि कोकण रेल्वेने सिंधुदुर्ग जिल्ह्याला काय दिलंय तर जनरलच्या डब्ब्यातून गुरा ढोराला पेक्षा सुद्धा त्रासदायक असणारा चौदा ते सोळा तासाचा प्रवास?. दुपदरीकरण झालं की सुधारेल, विद्युतीकरण झालं की सुधारेल अशीच गाजरं गेली दहा वर्षे दिलीत आम्हाला. मात्र रत्नागिरी पर्यत वेळेत धावणाऱ्या सगळ्या गाड्यांच घोडं सिंधुदुर्ग मध्ये आल्यावरच का माती खातंय? पुन्हा मडगांव नंतर वेळेत कशा काय धावतात सगळ्याच गाड्या? नेमकं आम्ही काय खाल्लंय कोकण रेल्वे आणि सरकार चं? कळेल काय आम्हाला? उत्तर शोधतोय आम्ही.
चिपीच्या विमानतळाची एक बोंब, कोकण महामार्गच्या चौपदरीकरणाची अशी अवस्था आणि कोकणरेल्वेची सिंधुदुर्ग बद्दलची अशीच अनास्था. मग आम्ही नेमकं कसं आयुष्य जगायचं याबद्दल आपल्या सरकारचा काही वेगळा कार्यक्रम असेल तर ते सुद्धा सांगा.
आपल्याच नेतृत्वाखाली तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेशजी प्रभू यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं भूमीपूजन केलंय. मोठ्ठा नाम फलक लावलेला आहे. मात्र आज झाडा झूडूपात आणि गवतात लुप्त झालाय तो. आज आपल्याला त्यासाठीच सस्नेह आमंत्रण. जेव्हा आपण सिंधुदुर्ग मध्ये येत्या चार डिसेंबरला याल तेव्हा थोडी वाट वाकडी करून आमच्या तथाकथित सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला भेट द्या. आपण सर्वजण मिळून तो शिलन्यास केलेला दगड पुन्हा शोधू. पुन्हा आपल्या शुभ हस्ते भूमिपूजन करून कामाला नव्याने सुरुवात करू.
आपण भूमिपूजन केलेल्या सगळ्या गोष्टी सुदैवाने यशस्वीरित्या सुरु होत आहेत देशभरात. मग ती मेट्रो असो किंवा बुलेट ट्रेन एक्सप्रेस रोड असोत वा राममंदिर या सगळ्या व्यापात आमच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस अगदीच शुल्लक, मात्र कदाचित तुमच्याच हस्ते होणाऱ्या दुसऱ्या भूमीपुजनाची वाट बघत असेल ते. तेव्हा आमच्या जिल्ह्याच्या कल्याणासाठी कै. मधु दंडवतेंच्या स्वप्नाला सत्यात आणण्यासाठी श्री. सुरेश प्रभू आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होऊ नये म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या समस्त झारीतील शुक्रचार्यांना गाडून टाकण्यासाठी मोदीजी तुम्ही याच. उत्तराची नाही तर तुमच्या आगमनाची वाट बघतोय.
आपले विश्वासू,
समस्त सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रेमी जनता.
( वेंगुर्ला - सावंतवाडी - दोडामार्ग )
दिनांक : २१.११.२०२३