विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी 'कोकण पॅकेज' घोषित करावे

माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सकारात्मक प्रतिसाद
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 16, 2022 20:05 PM
views 229  views

रत्नागिरी:

कोकणचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी, कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी 10 ते 12 हजार कोटींचे कोकण पॅकेज जाहिर करावे अशी महत्वाची मागणी भाजपाचे नेते माजी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ प्रतिसाद देत कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सकारात्मक असल्याचे आश्वासित केले. तर कृषी पंपाच्या वीज बिलात झालेली दरवाढ येत्या 15 दिवसात विशेष बैठक घेऊन कमी करतो असे आश्वासन सुद्धा त्यांनी निलेश राणे यांना दिले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांची भेट घेतली तर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रत्नागिरीसाठी घेतलेल्या आढावा बैठकीला सुद्धा निलेश राणे उपस्थित होते. यावेळी कोकण विकासाचे महत्वाचे मुद्दे निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. कोकणाचा विकास हा इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार देऊन होणार आहे. त्यासाठी नव्या उद्योग, व्यवसायांना या भूमीवर चालना दिली पाहिजेच. तर इथल्या पर्यटन व्यवसायाला नवी चालना देणे गरजेचे आहे. या पर्यटन व्यवसायाला शासनाने नवी चेतना दिली तर युवकांना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. एकीकडे उद्योग, पर्यटन व्यवसायाला चालना देतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते मजबुतीकरण हाही महत्वाचा विषय निलेश राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडला. दळणवळणाचे मजबूत जाळे ही कोणत्याही मूलभूत विकासाची गरज आहे. याही दृष्टीने जिल्ह्यातील उत्तम रस्ते पाणी, बंधारे अशा पायाभूत विकासासाठी राज्य शासनाने कोकणासाठी भरीव तरतूद करावी अशी मागणी निलेश राणे यांनी केली. यावेळी, आपण कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक असून कोकणासाठी भरीव तरतूद करण्याच्या दृष्टीने नक्कीच लवकरत लवकर निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी निलेश राणे यांना आश्वासित केले. पालकमंत्री उदय सामंत यांनीही निलेश राणे यांच्या मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद दिला.


कोकणातील शेती विकासासाठी सुद्धा विशेष लक्ष देणे आवश्यक असून यासाठी त्यांच्या मार्गातील येणाऱ्या अडचणी दूर करणे आवश्यक आहे. सध्या कृषी पंपासाठी पुरवण्यात येणाऱ्या वीजदरामध्ये 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल वाढले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच या वीज दरात विभागनिहाय तफावत असल्याची माहिती निलेश राणे यांनी उदाहरणासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर मांडला. याबाबत कोकणातील शेतकरी अडचणीत आहेत, यामध्ये लक्ष घालण्याची मागणी भाजपा नेते त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत येत्या 15 दिवसात हा विषय विशेष बैठक लावून मार्गी लावण्यात येईल आणि वीज बिलातील वाढ कमी करण्यात येईल असे सांगितले.