मराठा समाजाला मोठा दिलासा !

सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 23, 2023 16:06 PM
views 548  views

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा समाजाला जात आहे. याबाबत बाबत माहिती देतांना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे की, “ क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केले आहे. येत्या 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे. याच अर्थ असा होतो की, क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारले नसून, ते स्वीकारले आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर यात सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल असे विनोद पाटील म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन-चेंबर ही सुनावणी पार पडली होती. दरम्यान, यावेळी राज्य सरकारने सुनावणीत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे, या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्यात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता न्यायालयाने अखेर आज क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असल्याचं विनोद पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारसाठी आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याने मराठा आरक्षणाबाबत हा मोठा दिलासा समाजाला जात आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या याचिकेवर खुल्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता. यामुळे सरकारच्या आशा पल्लवित होतील. सरकारला तात्पुरता दिलासा देखील मिळाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता 24 जानेवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.