कणकवली : महाराष्ट्र शासनाने राज्यात १४,९५६ हजार पोलीस शिपाई पदांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९९ पोलीस शिपाई पदे भरली जाणार आहेत. ३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. जिल्हा पोलीस यंत्रणेनंही याला दुजोरा दिला आहे.
गेली दोन वर्षे पोलीस भरती झाली नव्हती. त्यामुळे युवावर्गाला पोलीस भरतीची प्रतीक्षा होती. पोलीस भरतीला नुकतीच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात १४, ९५६ पोलीस पदे भरणार, असे जाहीर केले होते. त्यानंतर संभाव्य रिक्त पदांची यादी जाहीर केली आहे.
पोलीस भरतीमध्ये रिक्त पदे असलेल्या संभाव्य यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९९ पोलीस शिपाई पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी होईल. त्यामध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. त्यामधून एकूण पदाच्या एकास दहा या प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात किमान ४० टक्के गुण आवश्यक आहेत. त्यामधून गुणवत्ता यादी तयार करून भरती केली जाणार आहे.