मुंबई : गणेशोत्सवापूर्वी कशेडी टनेलची सिंगल लेन सुरू करणारच असे वचन आपण सर्व कोकणवासीय बंधू-भगिनींना दिलं होतं. असं असलं तरीही खरंतर हे एक आव्हानच होतं, परंतु आपल्या बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली व अतिशय युद्धपातळीवर काम केले. केवळ अधिकारी, तंत्रज्ञ व कर्मचारी यांच्या प्रामाणिक प्रयत्न आणि एकजुटीमुळेच विक्रमी वेळात हे काम पूर्ण होवू शकले असे उदगार सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज काढले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज कशेडी बोगद्याचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. तसेच उद्घाटन झाल्यावर बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ वृक्षारोपण देखील करण्यात आले.
पोलादपूर(जि. रायगड) मधील भोगाव ते खेड(जि. रत्नागिरी) तालुक्यातील कशेडी हे अंतर पार करण्यासाठी आजवर सुमारे ४५ मिनिटे वेळ लागायचा. पण आता कशेडी बोगदा सिंगल लेन वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. अशा या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत कापता येणार आहे असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
कोकणात गणपतीसाठी जाणारे वाहनाने जाणारे गणेश भक्त व चाकरमानी प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल. एका अर्थाने आपल्याला गणपतीबाप्पाच पावला आहे. कोकणवासीय बंधू-भगिनींना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. कशेडी बोगदा उद्घाटन आणि वृक्षारोपण प्रसंगी कोकण विकास समितीचे पदाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सिंगल लेनचे ९०% पेक्षा अधिक काम पूर्ण
मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे ९०% पेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. सध्या काँक्रिटीकरणाच्या या कामातील महत्त्वाचा क्युरिंग पिरियड सुरु आहे असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. १५ सप्टेंबरनंतर बरेच कोकणवासी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जायला निघतील; त्यापूर्वीच या सिंगल लेनवरून वाहतूक खुली करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या आणि विशेषतः वाहन चालकांच्या सोयीसाठी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. याठिकाणी चहा-पाण्याची व्यवस्था, शौचालय सुविधा, पोलीस मदत कक्ष, वाहनचालकांसाठी आराम कक्ष अशा अत्यावश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात येत आहेत याचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते खारपडा येथे करण्यात आले.