
मंत्री उदय सामंत यांचा पुढाकार
रत्नागिरी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० जिल्हाध्यक्ष लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रा. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील. शिवसेना नेते उदय सामंत यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पक्षातील आपले वजन सिद्ध केले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रा. जालिंदर पाटील यांनी २० जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली. त्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. उदय सामंत म्हणाले, "शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या मुख्य प्रवाहात आणता येतील. तसेच, विकासाच्या कामातही मदत होईल." उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय निश्चित झाला. लवकरच हे २० जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.