मुंबई : पोलिसांनी दोन तोतया फुड सेफ्टी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या तोतया अधिकाऱ्यांनी फुड सेफ्टी अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील सुमारे 78 हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
परिमंडळ-12 च्या पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांनी सांगितले की, सेंट्रल प्रभु हॉटेलचे मॅनेजर संतोष श्रीधर शेट्टी यांनी 4 जानेवारी रोजी कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी धर्मेश शिंदे आणि अविनाश गायकवाड उर्फ वर्धान गायकवाड यांच्यावर फुड सेफ्टी अधिकारी असल्याचे दाखवून फसवणूक केल्याचा आरोप केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात तक्रार सत्य असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी 24 तासांत दोन्ही तोतया फुड सेफ्टी अधिकाऱ्यांना अटक केली.
पोलिस तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हॉटेल चालक तेजस हेगडे यांची 5 हजार रुपये आणि आरोही हॉटेलच्या मॅनेजरला फुड सेफ्टी अधिकारी असल्याचे दाखवून 4 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिस उपायुक्त पाटील यांनी सांगितले की, अटक केलेले दोन्ही आरोपी कांदिवली परिसरातील रहिवासी आहेत. या आरोपींकडून अन्न सुरक्षा अधिकाऱ्याचे बोगस ओळखपत्र, मारुती सुझुकी कार, एफडीआय विभागाचे बनावट फॉर्म आणि महाराष्ट्र शासन नावाची पाटी जप्त करण्यात आली आहे.