'स्नेक फ्रेंड्स' ! नागपंचमी विशेष

Edited by: विनायक गावस
Published on: August 20, 2023 21:14 PM
views 373  views

सावंतवाडी : श्रावण महिना सुरू झाला की, अनेक सण साजरे केले जातात. श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमी हा एक सण. यावेळी पावसाळ्याचा ऋतू असतो. त्यामुळे या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येते असं जुनीजाणती लोक सांगतात. ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं. बदलत्या काळाप्रमाणे नागपंचमीसह नाग आणि नागसंवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं आहे. 


नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे. तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे. नागाशी पूर्वीपासून दृढ नातं आहे. याच कारणांमुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते. त्यात शेती व शेतकरी हा जीवनातील महत्वाचा घटका आहे. नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं असल्यामुळेही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे. कारण शेतातील उंदरी-घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होत नाही. पण, साप हा प्राणी मानवाच्या मनात इतक्या खोलवर भिती निर्माण करून बसला आहे की एखाद्या व्यक्तीला समजवणे फार कठीण होतं. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या पूर्वजांच्या काळात दवाखाने, हॉस्पीटल, डॉक्टर उपलब्ध नव्हते. जंगले मोठी व घनदाट होती. तितक्याशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. यामुळे एखाद्या व्यक्तीला विषारी सर्पदंश झाल्यास औषधोपचार उपलब्ध नसल्याने काही वेळा ती व्यक्ती मृत्यूमुखी पडली. या घटनेमुळे तिथल्या लोकांमध्ये सापांविषयी भिती निर्माण झाली. अन्  स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दिसेल तो साप मारायला मानवानं  सुरूवात केली. त्यामुळेच कदाचित सापाला दैवत्व दिलं गेलं असाव, ज्यामुळे सापांच्या हत्येचं प्रमाण हळूहळू घटत आहे. अन सर्पमित्र नावाची संकल्पना पुढे येत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सापाच्या तब्बल 56 प्रजाती आढळून आल्या आहेत. यामध्ये सहा विषारी, बाकीचे बिनविषारी तर काही नीम विषारी पण आहेत. नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे प्रमुख चार विषारी साप आहेत. याच जातकुळीतील उपप्रजाती म्हणजेच कोरल, स्नेक चापडा इत्यादी साप आहेत. आंबोलीमध्ये ही सर्प जैवविविधता अधिक प्रमाणात पहायला मिळते. यामध्ये खैरीज ब्लॅक शिल्ड टेल म्हणजेच खापरकवल्या किंवा ग्रामीण भाषेमध्ये त्याला दूतोंड्याही म्हटलं जातं. हा साप पश्चिम घाटामध्ये काही प्रदेशांमध्येच आढळतो. मलाबारपीट वायपर हा दुर्मिळ साप सुद्धा आंबोली मध्ये आढळून येतो. 


सापांविषयी मोठ्या प्रमाणावर गैरसमजुती निर्माण होण्यास काही जुने मराठी-हिंदी चित्रपट किंवा सिरीयल कारणीभूत आहेत. ज्यामध्ये सापांविषयी अनेक गैरसमज पसरवण्यात आले आहेत. जे बघून लोकांमध्ये सापांविषयीची अंधश्रद्धा आणि भीती कमालीची वाढली आहे. सर्पमित्रांकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेली सापां विषयाची जनजागृती यामुळे आता ही भीती कमी झाली आहे. सापांचे प्राण वाचू लागले आहेत.* :- *काका भिसे, मानद वन्यजीव रक्षक, सिंधुदुर्ग वनविभाग.

सापांविषयीच्या जनजागृतीसाठीचे काही उपक्रम, सर्पमित्रांची धडपड यामुळे समाजातील साप या शब्दाबद्दल असणारी भीती हळूहळू कमी होत चालली आहे. सावंतवाडीतील राजन निब्रे, तुषार विचारे, नावीद हेरेकर, काका भिसे यांसारखे अनेक सर्पमित्र गावागावात, शहराशहरात कार्यरत आहेत. रात्री अपरात्री साप पकडत लोकांना भयमुक्त करून तो साप नैसर्गिक अधिवासात सोडत आहेत. यांसारख्या सर्पमित्रांमुळे एकेकाळी मनात घर करुन बसलेली सापाबद्दली भीती हळुहळु का होईना दुर होऊ लागली आहे. नवी पिढी सापांच्या प्रजातीबद्दल माहिती घेण्यासाठी, त्यावर संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी पुढे येत आहे. म्हणूनच, आज नागपंचमीसह नाग आणि नागसंवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्व प्राप्त होत आहे. अन् याच श्रेय केवळ एक दिवस पूजा करून न थांबता ३६५ दिवस सर्पमित्र म्हणून समाजात कार्यरत असणाऱ्यांना या लोकांना जातय.


सर्पमित्र

 राजन निब्रे 

9403594335

तुषार विचारे 

9423881021

नावीद हेरेकर

82375 48837

काका भिसे

75884 47161