
सावंतवाडी : चविष्ट खाऊ, छानशा गप्पा आणि माणुसकीची जपलेली नाती, हे सर्व एका वेगळ्या उपक्रमात अनुभवायला मिळालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ नं. ४ मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत याची प्रचिती आली. 'आमचा खाऊ मस्त, सर्वांनी केला फस्त’ या नावाने सुरु झालेला हा उपक्रम सध्या गावात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
प्रत्येक आठवड्यात एक दिवस जेव्हा इथे शाळेतील घंटा वाजते, तेव्हा पाटी-पुस्तकांइतकाच एका डब्यातून बाहेर येतो 'खास खाऊ'. पण हा खाऊ फक्त पोटासाठी नाही, तर मनासाठीसुद्धा आहे.
या उपक्रमात विद्यार्थी वेगवेगळे पदार्थ घरी तयार करून आणतात. ते इथे सगळ्यांना वाटले जातात. एकत्र खाल्ले जातात आणि विशेष म्हणजे प्रत्येकजण स्वतः सांगतो मी काय आणलंय, त्याची चव कशी आहे, त्याचे आरोग्याला काय फायदे आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दातृत्वाची भावना निर्माण होते. एकमेकांप्रती आपुलकी वाढते आणि खऱ्या अर्थाने सामानतेचा अनुभव त्यांना मिळतो. आमचा उद्देश केवळ खाऊ वाटणे नाही. आम्ही विद्यार्थ्यांना एकमेकांना समजून घेणे, समाजातील विविधता स्वीकारणे आणि एकत्र राहण्याचे महत्त्व शिकवत आहोत असं शाळेचे शिक्षक जावेद तांबोळी यांनी सांगितलं. तसेच मुलांनी घरी जाऊन सुद्धा इतरांनी काय आणलं होतं त्याची चव कशी होती हे सांगायचं आहे. आमचा खाऊ मस्त, सर्वांनी केला फस्त हा उपक्रम म्हणजे एक सामाजिक शिक्षणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे.जिथे एक वाटी भाजीसुद्धा सहजीवन शिकवू शकते – तिथे शाळा हीच खरी संस्कारशाळा ठरते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. ४ मराठी येथे "आमचा खाऊ मस्त, सर्वांनी केला फस्त" या नावाने एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये दातृत्वाची, आपुलकीची आणि समानतेची भावना जोपासण्यासाठी निश्चितपणे मदत होईल.
तसेच विद्यार्थ्यांचे प्रस्तुतिकरण कौशल्य वाढते आणि अन्नपदार्थांबाबतचे ज्ञान समृद्ध होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ सामाजिक भावना नव्हे तर आरोग्यविषयक जागरूकता, स्वच्छता, सामायिकरणाची सवय आणि सहकार्याचा संस्कार विकसित होत आहे असंही ते म्हणाले.