
सावंतवाडी : सावंतवाडी येथील महादेवाचे भाटले परिसरात सामाजिक कार्यकर्ते आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सदस्य नरेंद्र देशपांडे यांच्या निवासस्थानातील परसबागेत यावर्षी अनोखा आणि दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. त्यांच्या बागेत एकाच वेळी तब्बल १५ ब्रह्मकमळे फुलली आहेत.एरव्ही क्वचितच दिसणारे हे पवित्र आणि सुंदर फुल एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने बहरल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
नरेंद्र देशपांडे यांनी या विलोभनीय दृश्याचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. ब्रह्मकमळांचे एकाच वेळी फुलणे हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार मानला जातो आणि देशपांडे यांच्या बागेतील हा अनोखा नजारा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.