Ind Vs Eng : भारताने हातातली कसोटी गमावली

अवघ्या २२ धावांनी पराभव
Edited by:
Published on: July 14, 2025 22:27 PM
views 65  views

लंडन : रवींद्र जडेजाने चिवटपण दाखवत भारताला विजयाची आशा दाखवली होती. पण त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळत नव्हती. पण जडेजा अखेरपर्यंत लढला. पण मोहम्मद सिराज बाद झाला आणि भारताने हा सामना २२ धावांनी गमावल्याचे पाहायला मिळाले. जडेजाने यावेळी नाबाद ६१ धावांची खेळी साकारली, पण विजयासाठी ती तोकडी ठरली. इंग्लंडने या सामन्यात २२ धावांनी विजय साकारत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.


भारताला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते, तेव्हा ते माफक वाटत होते. भारत हे आव्हान सहजपणे पूर्ण करेल, असे वाटत होते. पण चौथ्या दिवशीच भारताने चार विकेट्स गमावल्या आणि तिथे सामना दोलायमान अवस्थेत आला होता. कारण इंग्लंडने जोरदार कमबॅक केले होते. त्यामुळे पाचव्या दिवसावर सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. पण भारताची पाचव्या दिवसाची सुरुवात वाईट झाली. कारण ऋषभ पंत फलंदाजीला आला आणि त्याला जास्त धाा करता आल्या नाहीत.

ऋषभ पंत यावेळी फक्त ९ धावांवर बाद झाला आणि भारताला पहिलाच धक्का बसला. कारण पहिल्या डावात पंतने अर्धशतक झळकावले होते, त्यामुळे त्याची विकेट भारतासाठी महत्वाची होती. पण तो फक्त ९ धावावंर बाद झाला. त्यानंतर सर्वांच्या नजरा या लागलेल्या होत्या त्या केएल राहुलकडे. कारण राहुल हा असा एकमेव खेळाडू होता जो सुरुवातीपासून खेळपट्टीवर ठाण मांडून होता. पहिल्या डावात त्याने शतकही झळकावले होते. त्यामुळे राहुलची विकेट भारतासाठी महत्वाची होती. पण यावेळी बेन स्टोक्सने जलद चेंडू टाकला आणि त्याला आपल्या जाळ्यात फसवले. राहुल पायचीत झाला आणि इंग्लंडने जोरदार सेलिब्रेशन केले. कारण त्यांच्यासाठी ही विकेट सर्वात महत्वाची होती. राहुलला यावेळी ३९ धावा करता आल्या. राहुल बाद झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी आला, पण त्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर जडेजाने संघाचा डाव सावरला.

रवींद्र जडेजाला यावेळी चांगली साथ दिली ती नितीश कुमार रेड्डीने. या दोघांनी संघाची पडझड तर थांबवली आणि त्यांनी संघाला विजयाच्या दिशेने न्यायला सुरुवात केली.