
कणकवली : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम 1961 चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गण रचनेची प्रारूप अधिसूचना 14 जुलै रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
प्रारूप प्रभाग रचनेचा कणकवली तालुक्याचा नकाशा व सिंधुदुर्ग जिल्हयाचा नकाशा तहसिलदार कार्यालय कणकवली व पंचायत समिती कार्यालय कणकवलीच्या नोटीस बोर्डवर आज दिनांक 14 जुलै 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे. या प्रभागात रचनेवर कुणाची हरकत असल्यास 21 जुलै 2025 पर्यंत तहसिलदार कार्यालय मध्ये हरकती स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली आहे.