
कुडाळ : कुडाळ तालुक्यात रविवारी सायंकाळी सात दिवसांच्या श्री गणेश मूर्तींचे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा गगनभेदी जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
कुडाळ शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात रविवारी सायंकाळपासूनच विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत भक्तांनी आपल्या लाडक्या दैवताला निरोप दिला. संपूर्ण तालुका बाप्पाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
कुडाळ शहरातील मुख्य विसर्जन स्थळ असलेल्या भंगसाळ नदीवर सायंकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणच्या नदी, तलाव आणि ओहोळ आदी जलस्रोतांच्या ठिकाणी सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले. अत्यंत उत्साहात आणि शांततेत सात दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला.










