LIVE UPDATES

डिजिटल क्रांतीच्या युगातही जपलेली पारंपारिकता

कोकणातील गणपतीच्या मागील 'भिंतीवरील चित्रकला' आणि कलाकारांची जिद्द
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 16, 2026 17:29 PM
views 34  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : निलेश सुरेश ओरोसकर

कोकणात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली की घरांमधील आवराआवर, साफसफाई आणि रंगरंगोटीला वेग येतो. या उत्सवातील सर्वात जुनी आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे गणपती बाप्पाच्या मागील भिंतीवर रेखाटली जाणारी पारंपरिक हस्तचित्रे. आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगात फ्लेक्स आणि प्लास्टिक पडद्यांचा सुटसुटीत पर्याय उपलब्ध असतानाही, कोकणात ही पारंपारिकता टिकवून ठेवण्याचा ध्यास काही कलाकारांनी आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.

भिंतीवरील चित्रकलेची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा

शास्त्रानुसार बाप्पाच्या पाठीमागे 'ओम' किंवा 'कमळ' रेखाटणे अतिशय शुभ मानले जाते. यासोबतच निसर्ग देखावे, विष्णू, महादेव आणि विविध पौराणिक रूपे भिंतीवर साकारली जातात. 

या चित्रांमागे काही सामाजिक व सांस्कृतिक नियमही जोडलेले असत. वर्षाभरात घरात कोणाचे निधन झाले असल्यास भिंतीवरील जुने चित्र पुसून टाकले जाई. मयत झालेली व्यक्ती पुरुष असल्यास भिंतीवर वडाची फांदी वा पान आणि स्त्री असल्यास तुळशीचे चित्र रेखाटण्याची प्रथा होती.

डिजिटल बॅनर्स आणि रेडीमेड पडद्यांची मागणी वाढलेली असतानाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनाव येथील भाई आंगणे यांनी गेल्या ३० वर्षांपासून ही परंपरा निष्ठापूर्वक जपत ठेवली आहे.

"पूर्वी लोकांकडे पैसे कमी असायचे, तेव्हा नारळ, भात किंवा खाण्याच्या वस्तू देऊन आमचा सन्मान केला जाई. आज चित्राच्या आकारानुसार १००० ते १५०० रुपये मानधन घेतले जाते. मात्र, कोणाची परिस्थिती नसेल आणि त्यांनी ५० रुपये दिले तरी आम्ही ते गोड मानून स्वीकारतो," असे भावूक अनुभव भाई आंगणे यांनी सांगताना कलेतील जिव्हाळा स्पष्ट केला. 

पूर्वी रंग काम करताना रंग उपलब्ध नसायचे त्यावेळी झाडांच्या पानापासून, हळद, कुंकू अशा नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जायचा. मुळातच डिजिटल पडदे किंवा बॅनर असले तरी भिंतीवरती काही ना काही चित्र असणे खूप गरजेचे आहे असे भाई आंगणे यांनी सांगितले. ही पारंपरिक कला डिजिटल क्रांतीच्या ओघात नष्ट होऊ नये, म्हणून त्यांनी स्वतः दोन तरुण कलाकारांना भिंतीवरील चित्रकलेचे प्रशिक्षण देऊन तयार केले आहे.  

कसाल गावचे सरपंच राजन परब यांच्या घरी आजही ही जुनी परंपरा पूर्ण निष्ठेने पाळली जाते. भिंतीवर हस्तचित्र रेखाटूनच ते दरवर्षी बाप्पाचे स्वागत करतात.डिजिटल क्रांतीच्या काळात गावातील कलाकार जिवंत राहिला तरच ही लोककला टिकेल. या कलाकारांची कला जपण्यासाठी त्यांना काम देणे ही आजची गरज आहे, असे मत सरपंच राजन परब यांनी मांडले. पूर्वी घरांना मातीचे रंग लावून ही चित्रे काढली जायची, आता त्यांची जागा केमिकल रंगांनी घेतली आहे.

 तरीही फ्लेक्स किंवा बॅनरपेक्षा हाताने काढलेल्या चित्रात जो जिवंतपणा असतो, तो डिजिटल प्रिंटमध्ये कधीच येत नाही. घरातील मुलांच्या वा कुटुंबीयांच्या आवडीनुसार हवा तसा देखावा हे कलाकार भिंतीवर हुबेहूब रेखाटून देतात.

डिजिटल क्रांतीने तंत्रज्ञान सोपे केले असले, तरी कोकणच्या मातीतील आपुलकी आणि पारंपारिकता या हस्तचित्रांमध्येच दडलेली आहे. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपली मूळ संस्कृती जिवंत ठेवायची असेल, तर गावच्या कलाकारांना मान देणे आणि ही कला जपून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.