
काही दिवसांपूर्वी गोव्यातील हडपडे (आरपोरा) गावात आग लागण्याची घटना घडली आणि त्यात तब्बल पंचवीस जणांचा मृत्यू झाला. या भयानक घटनेनंतर वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून या घटनेबाबत उद्वेग व्यक्त करणाऱ्या बातम्या छापून आल्या. विनापरवाना कसे धंदे चालतात, प्रदुषणाचे नियम कसे धाब्यावर बसवले जातात, बेकायदेशीर बांधकामे कशी केली जातात, यात माफिया कसे गुंतलेले आहेत, गोव्याबाहेरच्या लोकांनी पैशाच्या जोरावर यंत्रणा कशी वेठीस धरली आहे, हे चालू रहाण्यामागे कसा भ्रष्टाचार आहे, सरकारी अधिकाऱ्यांपासून राजकारण्यापर्यंत या भ्रष्टाचारात कसे बुडले आहेत, जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या नुकसान भरपाईचे काय वगैरे अनेक पैलूंवर चर्चा झाली.
पण एक पैलू मात्र दुर्लक्षित राहिला. तो म्हणजे 'नाईट लाईफ' नावाची गोष्ट. त्याच्यावर मात्र क्वचितच चर्चा झाली. हे मोठे आश्चर्य आहे की रात्री अपरात्री बायका नाचवल्या जातात, चंगळवादाखाली संस्कृतीचा बटबटीत र्हास होत आहे यावर 'ब्र' कोणी काढत नाही.
थोडासा विचार करा. 'नाईट लाईफ' नावाने चाललेला हा उद्योग हा काही दशावतारी नाटकाचा, कीर्तनाचा किंवा मंगळागौरीच्या जागरणाचा कार्यक्रम नव्हे. तुम्ही म्हणाल, 'हा कसला मुद्दा उपस्थित करताय. 'नाईट लाईफ' हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. गोवा हे पर्यटन राज्य. समुद्र किनाऱ्यावर लोक मौजमजेसाठी येतात. तिथे मेजवान्या, संगीत, नृत्य वगैरे चालणारंच.' मी त्यावर विचारेन की हे जे काही मनोरंजन आहे, तिथे कोणीही सभ्य माणूस आपल्या कुटूंबाला, बायको-मुलांना, परिवाराला घेऊन जाऊ शकेल काय? अशा ठिकाणी आपल्या घरातील स्त्रियांना घेऊन जाणे सुरक्षित वाटेल काय? यावर बहुतेकांचे उत्तर 'नाही' असे असेल.
मौजमजेसाठी लोक निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात, त्या प्रांतातील पक्वान्नांचा आस्वाद घेतात, तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहतात. तेथील कलांचा आस्वाद घेतात. यावर एखादा म्हणेल की 'संगीत, नृत्य या कलाच तर तिथे सादर केल्या जातात.' पण तेथील संगीत, नृत्य हे तुमच्या मनाला शांती देणारे भरतनाट्यं वगैरे शास्त्रीय नृत्य असते की तुमच्या वासना चाळवणारे नृत्य असते? या क्लबमध्ये महिलांना ज्या कपड्यात आणि ज्या प्रकारे नृत्य करायला लावले जाते, त्याप्रकारे आपल्या घरातील महिलांनी वासनाधुंद पुरुषांच्या पुढ्यात नृत्य केलेले आम्हाला आवडेल का? अजिबात नाही आवडणार. त्याहीपुढे वासना चाळवलेल्या पुरुषांची गर्दी फक्त नृत्याचा आस्वाद घेण्यापुरतीच मर्यादित राहील की लैंगिक संबंध ठेवण्यासाठी व त्यासाठी वाटेल ते पैसे फेकून विकत घ्यायचा प्रयत्न करतील? यावर काही जणांचा युक्तिवाद असेल की 'या महिला बाहेरच्या आहेत.' माझा मुद्दा असा आहे की स्त्री कुठचीही असो तिचे शोषण माझ्या जवळपास होत असेल आणि मी त्याकडे दुर्लक्ष करत असेन तर मी त्या पापाचा वाटेकरी आहे. अशा अधर्म गोष्टीचा विरोध करायलाच हवा.
दुसरे म्हणजे आपल्या जवळपास असे शोषण करणाऱ्या व्यक्ती शोषण करण्यासाठी येत असतील तर त्या एक दिवस आपल्या घराचे दार ठोठावायला कमी करणार नाहीत. याचा अर्थ अशा वासनाधुंद पर्यटनामुळे आपल्या घरातील व्यक्तीदेखील सुरक्षित नाहीत.
'नाईट लाईफ'च्या मौजमजेतील दुसरा घटक म्हणजे नशा. दारु, सिगारेट तर सर्रास आहेच, शिवाय विविध ड्रग्जचे सेवनही आहे. याचा परिणाम बाहेरून येणाऱ्या पर्यटकांपुरता मर्यादित नाही. तो स्थानिक लोकांवरदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. पाच वर्षांपूर्वी मी आझिलो हाॅस्पिटलात मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करत असताना किनारी भागातील शाळेत जाणारी अनेक मुले ड्रग्जचे व्यसन लागलेय म्हणून ओपीडीत यायची. एक स्थानिक मुलगी (स्थलांतरित नव्हे) जी दहावीत शिकत होती, धुम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी उपचार घ्यायला आली होती.
जेव्हा अशा प्रकारचे पर्यटन फोफावते तेव्हा त्यात मारामारी, खून, लूटमार, मोलेस्टेशन, बलात्कार वगैरे गुन्हेगारी देखील फैलावते. याचा दूरगामी परिणाम सभ्य पर्यटक येण्यावर होणार हे साहजिक आहे. आपणच विचार करून बघा, आपण अशा ठिकाणी फिरायला जाऊ का की जिथे चोरी, लूट, मारामारी, खून वगैरे गुन्हे वाढलेत?
पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला असेल, पैसा आला असेल, भौतिक जीवनमान उंचावले असेल. पण त्यासाठी समाज म्हणून आम्ही कोणती किंमत चुकती करत आहोत? सांस्कृतिक र्हासाला आम्ही डोळे मिटून तोंड मिटून हैदोस घालू देत आहोत. काय होतील याचे भविष्यातील परिणाम? कॅन्सरप्रमाणे हे संपूर्ण समाजात पसरेल तेव्हा काय होईल? त्यानंतर बदल करता येईल का? मागे फिरता येईल का?
मी जेव्हा अनेक मित्रांशी याबाबत बोललो तेव्हा त्यांनी असहाय्यता व्यक्त केली, सरकारवर दोष ढकलला, पोलीस व प्रशासनावर दोष ढकलला. पण माझा प्रश्न असा आहे, की या 'नाईट लाईफ' क्लबसाठी जागा कोणी दिल्या? सरकारने भूसंपादन केले होते काय? नाही ना. मग बसल्याजागी भाड्याचे भरपूर पैसे मिळतात म्हणून स्वतःच्या जमीनी, इमारती भाड्याने देणारे याला जबाबदार नाहीत का? या क्लबमध्ये काम करणारे मग ते झाडू मारणारे असो की व्यवस्थापक असो, त्यांना अशा क्लबमध्ये आपल्या घरातील बायका नाचल्या तर चालेल काय, आपल्या घरातील मुले ड्रग्ज घेऊ लागली तर चालेल काय? मग अशा क्लबमध्ये काम स्वीकारणारे लोक याला जबाबदार नाहीत का? अशा क्लबमुळे जास्त पर्यटक येतात व आपला अधिक धंदा होतो म्हणून याकडे कानाडोळा करणारे त्या भागातील इतर दुकानदार याला जबाबदार नाहीत का?
'नाईट लाईफ' च्या नावाखाली जे काही घडतेय ते सर्वस्वी अधर्म आहे. रोजगारासाठी अशा अधर्मी कृत्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी होणे पाप आहे. आमच्या पवित्र भूमीत असा अधर्म घडू नये यासाठी काहीही प्रयत्न न करणारे आणि फक्त बघ्याची भूमिका घेणारे आम्ही सर्वच याला जबाबदार नाही का? एक साधा प्रश्न आपण स्वतःला विचारू. छत्रपती शिवाजीमहाराजांनी महसूलाचे साधन म्हणून अशा प्रकारचे पर्यटन होऊ दिले असते काय? नक्कीच नाही. 'नाठाळाच्या माथी हाणू काठी' म्हणणारे जगद्गुरू तुकोबाराय असते तर असा अधर्म माजवला जात असताना गप्प राहिले असते काय? अजिबात नाही. हिंदवी स्वराज्याचे नि वारकरी संप्रदायाचे आम्ही वारसदार आज याबाबत हतबल का आहोत?
आम्ही व्यवस्थेला हा प्रश्न का विचारत नाही की रेस्टॉरंटमध्ये वासना चाळवल्या जातील अशा तर्हेने महिलांना नाचवणे कोणत्या कायद्याद्वारे निर्दोष कृत्य आहे? कोणत्या कायद्याअंतर्गत महिलांना उत्तान नृत्यासाठी भाड्याने बोलावले जाते? कोणत्या कामगार कायद्यानुसार रात्री-अपरात्री असुरक्षित ठिकाणी महिलांना कामाला बोलावणे निर्दोष आहे? कोणत्या कायद्याअंतर्गत सूर्यास्तानंतर कोणाही महिलेला बारमध्ये कामावर ठेवणे निर्दोष आहे? बारमध्ये वेटर म्हणून काम करणे, रेस्टॉरंटमध्ये अपरात्री नृत्य करणे ही कोणत्या कायद्याअंतर्गत अत्यावश्यक सेवा आहे? हे महिलांच्या शरीराचे क्रयवस्तूकरण नाहीए का?
आम्ही नागरिक म्हणून सम्यक आजिविकेचा, निष्पाप रोजगाराचा विचार करणार की नाही? आम्ही आमच्या जीवनात धर्माला ठेवणार आहोत की नाही? या चंगळवादी संस्कृतीचा प्रभाव आमच्या पुढच्या पिढ्यांवर पडून त्या सांस्कृतिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, अध्यात्मिकदृष्ट्या बरबाद होऊ नयेत म्हणून आम्ही आजच गांभीर्याने पावले उचलणार आहोत की नाही? त्यांच्यावर संस्कार करणार आहोत की नाही? की शाळा नावाच्या कारखान्यात मुलांना घालून फक्त ॲकॅडेमिक प्रगतीचा आणि क्रयशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत? जर आम्ही स्वतःला आणि भावी पिढीला चंगळवादी झंजावातापासून वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार नसू तर आम्ही संतांच्या भूमीत जन्माला येऊन करंटेच म्हणायला हवेत.
जीवन हे चंगळीसाठी वाहणे हे मनुष्याचे श्वापदीकरण आहे. दुसरीकडे जीवनाला शील संवर्धनासाठी वाहणे हे मनुष्याचे दैवतीकरण आहे. तेव्हा आपण आज जिथे असू तिथून आमचा प्रवास दैवतीकरणाच्या दिशेने व्हावा, यासाठी आपण आजच्या गोवामुक्ती दिनाच्या निमित्ताने संकल्प करुया!
डाॅ.रुपेश पाटकर
मनोविकार तज्ञ














