६० वर्ष सहजीवनाची !

महादेव आणि प्रेमा लिंगवत यांची मॅरेज एनिवर्सरी उत्साहात
Edited by: विनायक गांवस
Published on: January 21, 2026 16:49 PM
views 50  views

सावंतवाडी : अवघे दीड वर्षांचे असताना पितृछत्र हरपूनही जिद्द बाळगत भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या वेर्ले (ता. सावंतवाडी, सध्या रा. माठेवाडा सावंतवाडी ) येथील महादेव जानू लिंगवत यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा जीवनपट उलगडला. त्यांचे निकटवर्तीय, सहकारी आणि वेर्ले ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सावंतवाडी राजवाड्यातील बँक्वेट हॉलमध्ये महादेव जानू लिंगवत आणि सौ. प्रेमा लिंगवत यांचा लग्नाचा ६० वा वाढदिवस उत्साहात झाला.महादेव लिंगवत आणि प्रेमा लिंगवत यांनी जीवनप्रवासात असंख्य माणसे प्रेमाने जोडली, याचा प्रत्यय यावेळी आला. 

त्यांनी केवळ दोन रुपये घेऊन नोकरीसाठी पुणे गाठले होते. तेव्हाचा खडतर प्रवास ऐकून उपस्थित स्तब्ध झाले. पुणे येथे हॉटेलात महिनाभर नोकरी केली. त्यानंतर पुन्हा गावी आले, नंतर बेळगाव गाठले. तेथे सैनिक कॅन्टीनमध्ये काम केले. त्यानंतर ते सैन्यात भरती झाले. वडीलभाऊ गोविंद आजारी असल्याने नोकरी सोडून पुन्हा गावी परताव लागल, त्यांची सेवा केली आणि त्यानंतर पुन्हा सैन्यात भरती झाले असा अनुभव लिंगवत यांनी यावेळी कथन केला. यावेळी त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन, वेर्लेचे माजी सरपंच गोविंद जानू लिंगवत, मुलगे दिनेश, प्रदीप, मुलगी वैभवी शिंदे, जावई घनश्याम शिंदे, सून प्रिया, नातवंडे पूजा, प्रथम,  पुतण्या सुप्रिया राऊळ, रजनी सावंत, बाळकृष्ण लिंगवत, दिनेश लिंगवत, वेर्ले दूध खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जानदेव लिंगवत, दाणोली येथील मेहुणे कृष्णा सावंत, बाबू सावंत, सावंतवाडी राजघराण्याचे खेम सावंत-भोसले, अटल प्रतिष्ठानचे ॲड. नकुल पार्सेकर, सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, नगरसेविका दीपाली भालेकर, दिलीप भालेकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, डॉ. राजशेखर  कार्लेकर, रश्मी कार्लेकर,  श्री. जोशी, सौ. जोशी, शीतल वर्दम, संजय सावंत, माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष बाळकृष्ण लिंगवत उपस्थित होते. महादेव उर्फ आबा लिंगवत यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, सावलीसारखी सोबत देणाऱ्या सौ. प्रेमा लिंगवत यांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. आज आबांनी जे काही यश आणि सन्मान मिळवला आहे, त्याचा भक्कम पाया म्हणजे प्रेमा काकूंचे कष्ट आणि पाठिंबा आहे, असे मत उपस्थितांनी मांडले.


आबा जेव्हा सीमेवर देशाचे रक्षण करत होते किंवा नंतर वीज मंडळात कर्तव्य बजावत होते, तेव्हा घरची सर्व जबाबदारी आणि मुलांचे संगोपन प्रेमा काकूंनी अत्यंत समर्थपणे सांभाळले. आबांच्या प्रत्येक कठीण काळात त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या काही काळापूर्वी आबांच्या शस्त्रक्रियेनंतर प्रेमा काकूंनी त्यांची घेतलेली अहोरात्र शुश्रूषा आणि काळजी यामुळेच आबा अत्यंत वेगाने बरे होऊ शकले. त्यांची ही सेवा केवळ कौटुंबिक नसून ती त्यांच्यातील प्रेमाची आणि समर्पणाची साक्ष आहे. आबांनी सीमेवर राहून देशाची सेवा केली, तर आईने (प्रेमा काकूंनी) घराचा किल्ला लढवून आबांना निश्चिंत केले. ६० वर्षांच्या या संसारामध्ये अनेक चढ-उतार आले, पण आईच्या धैर्यामुळे आणि आबांच्या कष्टांमुळे हे लिंगवत कुटुंब आज दिमाखात उभे आहे. आबांच्या शस्त्रक्रियेच्या काळात आईने घेतलेली मेहनत ही कोणत्याही औषधापेक्षा मोठी होती. आज आबांचे यश, त्यांचे आरोग्य आणि या कुटुंबाचा आनंद हे  

 महादेव जानू लिंगवत यांचे जीवन म्हणजे शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि निरंतर सेवेचे एक उत्तम उदाहरण आहे. भारतीय सैन्य दलातील पराक्रम, वीज मंडळातील  योगदान आणि निवृत्तीनंतरचे सामाजिक कार्य अशा तीन टप्प्यांत त्यांचा हा प्रवास उलगडतो. १९६३ मध्ये भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठित 'बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप' (BEG), पुणे येथे ते रुजू झाले. १९६५ मध्ये आसाम सीमेवर भारत-चीन तणावादरम्यान महत्त्वपूर्ण कामगिरी केली. १९७१ मध्ये भारत-पाक युद्धाच्या रणधुमाळीत अमृतसर (पंजाब) सेक्टरमध्ये प्रत्यक्ष शत्रूच्या बॉम्बस्फोटांचा आणि आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला. लष्करी अभियांत्रिकी नियोजनात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या अतुलनीय सेवेबद्दल त्यांना विविध लष्करी पदकांनी सन्मानित करण्यात आले. निवृत्तीनंतर महाराष्ट्र राज्य विद्युत  मंडळात १९८१ - २००३ पर्यंत सेवा दिली.  १९८१ मध्ये यवत येथून कामाला सुरुवात केली. त्यानंतर तळेगाव (४ वर्षे), रत्नागिरी आणि शेवटी सावंतवाडी अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिली.२००३ साली त्यांनी सावंतवाडी येथून आपली शासकीय सेवा पूर्ण केली. सेवेतून निवृत्त झाल्यावरही ते स्वस्थ बसले नाहीत. सावंतवाडी येथील 'माजी सैनिक संघटने'चे संचालक म्हणून काम करताना त्यांनी शेकडो माजी सैनिकांना न्याय मिळवून दिला आणि त्यांच्या कल्याणासाठी योजना राबवल्या. आपल्या सामाजिक आवडीपोटी ते 'अटल प्रतिष्ठान' या संस्थेशी जोडले गेले. या माध्यमातून त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत.

ज्या वडिलांनी एकेकाळी वॉचमन आणि ड्रायव्हिंग करून मुलाला वाढवलं, त्याच आबांचा मुलगा प्रदीप आज जगातल्या सर्वात प्रतिष्ठित 'टाटा ग्रुप'मध्ये  वरिष्ठ पदावर ताठ मानेने काम करतोय. तर मुलगी पिंकू (वैभवी) ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे.

सैन्यातून निवृत्त झाल्यावर जग म्हणतं 'आता विश्रांती घ्या.' पण आबांच्या खांद्यावर संजू भाऊ, प्रदीप आणि पिंकू यांची स्वप्नं होती. वर्दी उतरली तरी बाणा तोच होता! पुण्यात वीज मंडळात वॉचमन म्हणून नोकरी सुरू केली. पगार कमी होता, म्हणून आबांनी भालेरावांच्या दुकानात हमाली केली, ओझं वाहिलं. दौंड-यवत-तळेगावच्या त्या वीज मंडळातील वॉचमनच्या ड्युटीवर, कडाक्याच्या थंडीत आबांनी दिवस-रात्र काम केलं. ज्या हातांनी एकेकाळी शत्रूवर गोळ्या झाडल्या, त्याच हातांनी किराणा दुकानात गोणी उचलल्या. का? तर आपल्या लेकरांनी जगात ताठ मानेने जगावं म्हणून! रत्नागिरीत आल्यावर ती 'राणी' (टेम्पो) चालवताना आबांनी रक्ताचं पाणी केलं.  कठीण काळ होता. पण आई आणि आबांच्या कष्टाने आम्हाला कधीच 'उन्हाची' झळ बसू दिली नाही, असे मनोगत मुलांनी मांडले, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. आयुष्याचा सर्वात कठीण काळ आमची वाट पाहत होता. वेर्लेच्या शेतात आबांना हार्ट अटॅक आला. काळजाचा ठोका चुकला आणि प्रदीपच्या पायाखालची जमीन हादरली. रुबी हॉल आणि कमांड हॉस्पिटलच्या लॉनवर प्रदीप ढसाढसा रडत होता. वाटलं होतं सगळं संपलं! पण तिथे देवासारखे धावून आले आमचे दिनेश अण्णा आणि मोठ्या वहिनी! वहिनींनी नर्स म्हणून धुरा सांभाळली आणि अण्णांनी आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिलं. अण्णा, वहिनी, दादा, आक्का, ताई, तात्या, भाई आणि भाऊ... हे सर्वजण एका पहाडासारखे उभे राहिले आणि आबा मृत्यूला हरवून पुन्हा घरी आले. ही ताकद केवळ एका संयुक्त कुटुंबातच असू शकते! सून प्रिया हिने गेल्या २० वर्षांत घराची जबाबदारी पेलली. आबा आणि आईंच्या आयुष्यात आलेली ३-४ मोठी संकटं, त्यांच्या ३-४ शस्त्रक्रिया या काळात टी सावलीसारखी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. हॉस्पिटलचे ते कठीण दिवस असोत किंवा घरातील रोजची देखभाल, ती कधीच थकली नाही. ती घराचा 'आरोग्य-स्तंभ' बनली. तर नातवंडे पूजा आणि प्रथम आजोबा आणि आजींना जीव की प्राण आहेत.

आबा सैन्यात होते, पण घराचा किल्ला लढवत होते दादा (गोविंद). आबांनी सीमेवर शस्त्र धरलं. पण दादांनी वेर्लेत घर आणि नाती जपली. आऊंच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाला लेकरासारखं सावरणारे आमचे दादाच होते.  आबांचा स्वभाव म्हणजे पेटता निखारा. सैन्यातून सुटीवर आल्यावर आबा फक्त घरी येत नसत, तर आधी गावात कानोसा घेत. 'माझ्या भावाला कुणी त्रास तर दिला नाही ना?' जर दादांबद्दल कुणी वाकडं बोललं असेल, तर आबांचा 'आर्मी अवतार' बाहेर यायचा. समोरचा कोणीही असो, आबांचा सज्जड दम पुरेसा असायचा. दादांसाठी आबा कोणाशीही भिडायला तयार असायचे. आबांनी सीमेवरून लिहिलेली ती लांबलचक पत्रं म्हणजे केवळ कागद नव्हते, तर आऊ आणि दादांसाठी असलेला मायेचा ओलावा होता. आऊची खुशाली विचारल्याशिवाय आबांचा दिवस पूर्ण होत नसे. दादांनी केवळ आबांना साथ दिली नाही, तर त्यांना प्रत्येक संकटात मार्गदर्शन केलं. पिठाची गिरणी असो, साऊंड सिस्टमचा व्यवसाय असो किंवा राजकारणात सरपंच म्हणून मिळवलेलं यश.  दादांनी स्वतःचं नाव कमावताना आपल्या धाकट्या भावाचं, आबांचं अस्तित्व नेहमी जपलं. आबा आणि दादा म्हणजे या घराचे दोन डोळे आहेत, ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करून दाखवलं!. कारिवडे येथील जमिनीपासून ते सावंतवाडीच्या माठेवाडा येथील आजच्या घरापर्यंतच्या प्रवासात दादांची साथ मोलाची होती.