
सावंतवाडी : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी आंबोली आणि मळेवाड या दोन मतदारसंघांत दोन्ही पक्षांकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे या ठिकाणी युतीचे उमेदवार कोण राहणार की दोघांमध्ये निवडणूक होणार ? हे २७ तारखेच्या माघारीनंतरच स्पष्ट होईल.
तालुक्यातील ९ जिल्हा परिषद जागांपैकी भाजपला ६ तर शिवसेनेला ३ जागांचे वाटप करण्यात आले होते. तसेच पंचायत समितीच्या १८ जागांपैकी ९-९ असे समसमान जागावाटप ठरले होते. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणी दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. यात आंबोली मतदारसंघात भाजपने शोभा गावडे यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेकडून सुप्रिया गावडे रिंगणात आहेत. दोघांनाही पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर माडखोल येथून भाजपकडून सुप्रिया मडगांवकर यांनी अर्ज दाखल केला आहे. कोलगावमध्ये भाजपचे उमेदवार महेश सारंग यांच्या विरोधात मायकल डिसोजा व माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर, माजगांव जिल्हा परिषदेसाठी भाजपचे विक्रांत सावंत यांच्या विरोधात उबाठाकडून माजी सरपंच दिनेश सावंत तर वेत्ये सरपंच गुणाजी गावडे व चंद्रकांत कुबल यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.इन्सुलीमध्ये शिवसेनेच्या झेविअर फर्नांडीस यांच्या विरोधात भाजपचे मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर व माजी सभापती मानसी धुरी यांनी तर तळवडेत भाजपचे उमेदेवार संदीप गावडे यांच्या विरोधात तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे व अमेय पै तर शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ रिंगणात आहेत. बांदा जिल्हा परिषदेसाठी भाजपचे प्रमोद कामत तर उबाठाच्या सुशांत पांगम यांनी अर्ज दाखल केले आहेत.आरोंदा मतदारसंघात शिवसेनेच्या सुदन कवठणकर यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सभापती शर्वाणी गावकर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तसेच मळेवाड मतदारसंघातही शिवसेनेकडून प्रियांका नारोजी यांनी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून अपर्णा सातोस्कर उमेदवार आहेत. या दोघांनाही त्या त्या पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आंबोली व विलवडे तसेच न्हावेली आणि मळेवाड पंचायत समिती जागांवरही भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत.
पंचायत समितीसाठी एकूण १०१ अर्ज दाखल
पंचायत समिती सदस्य पदासाठी आंबोलीमधून भाजपकडून शशिकांत गावडे तर शिवसेनेकडून मायकल डिसोजा, विलवडे पंचायत समितीसाठी भाजपचे प्रशांत सुकी शिवसेनेचे दिनानाथ कशाळीकर तर काँग्रेसचे संदीप सुकी, माडखोल पंचायत समितीसाठी भाजपकडून अनिता राऊळ तर कलंबिस्त मधून शिवसेनेचे रमाकांत राऊळ यांनी अर्ज दाखल केला. कोलगांव पंचायत समितीसाठी शिवसेनेकडून प्रणाली टिळवे तर कारिवडेतून विद्यमान सदस्या प्राजक्ता केळूसकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. माजगांव प .स. साठी भाजपकडून रुपेश उर्फ सचिन बिर्जे तर चराठा येथून शिवसेनेच्या उत्कर्षा गांवकर यांनी अर्ज दाखल केला. इन्सुलीत शिवसेनेचे रामचंद्र उर्फ काका चराठकर तर शेर्लेतून भाजपचे महेश धुरी यांनी अर्ज सादर केला. तळवडेतून शिवसेनेच्या सुष्मिता जाधव तर मळगांव येथून भाजपचे गौरव मुळीक यांनी अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी माजी सभापती राजेंद्र परब यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बांदा पंचायत समितीसाठी भाजपच्या रुपाली शिरसाट व तांबोळीत शिवसेनेच्या प्रियांका देसाई तर उबाठाच्या अर्चना पांगम यांनीही अर्ज दाखल केला आहे. आरोंदा पंचायत समितीत भाजपच्या नेहा कांबळी तर सातार्डा पंचायत समितीसाठी माजी पंचायत समिती सदस्य शेखर मांजरेकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. मळेवाडमधून भाजपकडून धनश्री मराठे अपक्ष मनिषा राऊळ तर शिवसेनेकडून तेजल मुळीक यांनी अर्ज दाखल केल्याचे समजते. तसेच न्हावेलीतून शिवसेनेकडून शरद धाऊसकर तर भाजपतर्फे अष्टविनायक धाऊसकर यांनी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, उबाठा शिवसेनेकडून जिल्हा परिषदेसाठी ५ ठिकाणी उमेदवार देण्यात आले आहेत. ज्यात तळवडे येथून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ निवडणूक लढवत आहेत. बांदा येथे सुशांत पांगम तर माजगाव येथे माजी सरपंच दिनेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. विलवडेमध्ये 'उबाठा'ने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. अर्ज सादर करण्याच्या आज शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ६० तर पंचायत समितीसाठी १०१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यात जिल्हा परिषदेसाठी तळवडे मतदार संघातून सर्वाधिक ११ अर्ज तर बांदा जिल्हा परिषद मतदार संघातून केवळ २ अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समितीसाठी बांदा येथून २ तर आंबोलीतून सर्वाधिक १२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार असून २७ तारखेला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमकी कोणाची कोणाशी लढत होणार याचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.














