
सावंतवाडी : आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असून यापुढेही जनता विकासाला साथ देईल असा विश्वास भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार शोभा गुलाबराव गावडे यांनी व्यक्त केला. तसेच विलवडे पंचायत समितीतून प्रशांत सुकी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
शोभा गावडे म्हणाल्या, आंबोली मतदारसंघ हा पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. या भागात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प येत असून भाजपच्या माध्यमातून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आलीत. त्यामुळे येत्या पाच वर्षांतही आंबोलीच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक प्रकल्प आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे त्यांनी वाटप केले. विकासाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विलवडे पंचायत समितीचे उमेदवार प्रशांत सुकी, आंबोली पंचायत समितीचे शशिकांत गावडे, गुलाबराव गावडे आदी उपस्थित होते.










