एकाच बॅलेट युनिटवर नोंदवा दोन मते ; ७ फेब्रुवारीला मतदान

कुडाळ तालुका निवडणूक
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 03, 2026 14:08 PM
views 81  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळच्या मतदानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मतदारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा दोन्ही उमेदवारांसाठी एकाच बॅलेट युनिटचा (EVM) वापर करावा लागणार आहे.

निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक मतदान केंद्रावर केवळ एकच बॅलेट युनिट उपलब्ध असेल. मतदारांनी पहिले मत जिल्हा परिषद गटासाठी नोंदवायचे व दुसरे मत पंचायत समिती गणासाठी नोंदवायचे आहे.

जोपर्यंत मतदार या दोन्ही पदांसाठी आपली मते नोंदवत नाहीत, तोपर्यंत त्यांची मतदान प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या पूर्ण होणार नाही. त्यामुळे मतदारांनी बॅलेट युनिटवरील चिन्हे आणि उमेदवारांची नावे काळजीपूर्वक पाहून आपले मत नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिनांक: शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी एकत्रित मतदान.

मतदान केंद्रावर कोणताही गोंधळ होऊ नये आणि प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार सचिन पाटील यांनी मतदारांना मतदान कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावून सहकार्य करावे, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.