"जीवनात जेव्हा कधी अडचण येईल, भावनिक गुंता होईल तेव्हा भगवत गीतेची आठवण कर," असे एकदा बाबा मला म्हणाले.
मला त्यांच्या या म्हणण्याचे फारसे काही वाटले नाही, कारण भगवत गीता ही सर्वात जुनी डाॅक्युमेंटेड सायकोथेरपी आहे, हे मला माहीत होते. अर्जुनाला ऐन रणभूमीवर भावनिक गुंता जाणवला होता. त्याचा परिणाम म्हणून त्याला शारीरिक चिन्हे जाणवली होती. तोंड कोरडे पडले, शरीराला थरथर वाटू लागली, अंगाची लाही होऊ लागली, हातपाय गळसांडून गेले, धनुष्य खाली पडले.
त्यावर श्रीकृष्णाने त्याला समजावून सांगितले आणि त्याचा भावनिक गुंता दूर झाला. त्यामुळे साहजिकच एखाद्याला भावनिक गुंता जाणवला तर गीतेकडून त्याला त्यावर मात करण्याची शक्ती मिळू शकते हे मला माहीत होते आणि तेच बाबा सांगत आहेत असे मला वाटले. त्यात नवीन ते काय असा विचार मी करत असतानाच बाबा पुढे म्हणाले, "तुला हे माहीत आहे का, की गीतेच्या उपदेशाची प्रत्यक्ष सुरवात दुसर्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून होते? आदीशंकराचार्यानी गीतेवरील भाष्य दुसर्या अध्यायापासून सुरू केले आहे."
"म्हणजे पहिला अध्याय फारसा महत्वाचा नाही का?" मी विचारले.
"अहं. पहिला अध्याय आपल्यासारख्या लोकांसाठी खूप मोठ्या आधाराचा आहे!" ते म्हणाले. त्यांच्या या म्हणण्याने माझी उत्कंठा आणखी वाढली.
"पाहिल्या अध्यायाच्या नावाचा कधी विचार केलायस का? त्याचे नाव आहे 'अर्जुन विषादयोग'. अर्जुनाच्या विषादाला म्हणजे त्याच्या भावनिक गुंत्याला 'योग' म्हटले आहे. विषाद वाटणे, भावनिक गुंता वाटणे हे त्रासदायक वाटले तरी ते लाजिरवाणे नाही हे गीता अधोरेखित करत आहे, हे तुझ्या लक्षात येतेय का?"
"हो. विषादाचाही योग होऊ शकतो!" मी म्हणालो.
"विषदाचा योग होऊ शकतो, हे तर आहेच. पण दुसराही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कुरुक्षेत्रावर अठरा अक्षौहीणी सैन्य होते. पण त्यातील अर्जुन सोडून इतर कोणालाही विषाद झाला नाही.
'जानामि धर्मं! न च प्रवृत्ती:' म्हणणार्या दुर्योधनाला विषाद झाला नाही. भरसभेत द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणाऱ्या दु:शासनाला विषाद झाला नाही. त्या दोन्ही सैन्यांपैकी कोण्या सामान्य सैनिकाला विषाद झाला नाही.
ज्यांना विषाद झाला नाही ते सामान्य सैनिक विषाद वाटलेल्या अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होते का? नाही.
उलट त्यांच्यातील अनेकांची बौद्धिक कुवतच इतकी मर्यादित असेल की अर्जुनाला काय वाटतेय हेच ते समजण्याच्या क्षमतेचे नसतील. असे असंख्य लोक असतात की जे त्यांच्या पदरी पडलेले आयुष्य प्राण्यांप्रमाणे गपगुमान जगत असतात. जसे गाईबैलांना शाब्दिक अपमानाचे काही वाटत नसते, तसे त्यांनाही काही वाटत नाही. काय नैतिक आणि काय अनैतिक, हा मूल्यांचा प्रश्न त्यांच्या मनात कधी उभा राहत नाही.
अर्जुन महाभारतीय युद्धाला उभा राहिला तेव्हा त्याच्या मुलांची देखील लग्ने झाली होती. त्याने जीवनाचे बरेच चढउतार पाहिले होते. धर्म काय, हे द्रोणाचार्यांनी त्याला शिकवले होतेच. अर्जुनाचे एक नाव गुडाकेश आहे. गुडाकेश म्हणजे ज्याने झोपेवर विजय मिळवला आहे असा. एवढी उत्तम त्याची मानसिक स्थिती होती.
एवढेच नव्हे तर साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याचा सखा होता. त्याच्याशी त्याच्या यापूर्वी 'धर्म काय, अधर्म काय' याबाबत चर्चा झाल्या नसतील का? पण तरीही त्याला ऐन युद्धाच्या वेळी विषाद वाटला, भावनिक गुंता झाला.
म्हणजे आपल्या जीवनात जर भावनिक गुंता निर्माण झाला आणि तो सोडवायचा कसा हे सुचले नाही तरी त्यात लाजिरवाणे काहीही नाही. अर्जुनाच्या बाबतीत जर असे घडू शकत असेल तर ते आपल्याही बाबतीत घडू शकते. हा महत्वाचा धडा गीतेचा पहिला अध्याय देतो. जेव्हा कधी जीवनात भावनिक गुंत्यात अडकशील तेव्हा त्याची शरम वाटू देऊ नकोस!
तेव्हा हे आठव की गुडाकेश म्हटल्या जाणार्या अर्जुनाचा भावनिक गुंता इतका तीव्र झाला होता की तो 'लढण्याऐवजी भिक्षा मागून जगेन' असा विचीत्र विचार करू लागला होता.
आणखीही एक मुद्दा लक्षात ठेव तो म्हणजे ज्याला भावनिक गुंता झाला असेल त्याचा गुंता कधी क्षुल्लक मानू नकोस. चार उपदेशाचे शब्द सांगून भावनिक गुंते सुटत नसतात. तो प्रयत्न कृष्णाने अर्जुनाच्या बाबतीत करून बघितला.
दुसर्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान म्हणतात,
कोठूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज
असे रुचे न थोरास ह्याने दुष्कीर्ति दुर्गति
निर्वीर्य तू नको होऊ न शोभे हे मुळी तुज
भिकार दुबळी वृत्ति सोडुनी ऊठ तू कसा
पण असे सांगून देखील त्याचा अर्जुनावर काहीही परिणाम झाला नाही. भगवंतांना अर्जुनाच्या विषादाचे कारण समजून घेऊन त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून द्यावे लागले. तेव्हा कुठे अर्जुनाचा गुंता सुटला.
काही सुविचार किंवा मोटीवेशनल वाक्ये म्हणून दाखवून टाळ्यांचे भाषण करता येईल, पण भावनिक गुंता सोडविता येत नाही."
बाबांचे हे म्हणणे किती महत्त्वाचे होते याचा प्रत्यय सायकीयॅट्रीमध्ये मानसोपचार शिकत असताना लक्षात येत गेला.
- डॉ. रुपेश पाटकर
मानसोपचार तज्ञ