
सावंतवाडी : कोकणवासीयांनी केलेला सत्कार हा माझा नसून वर्दी घातलेल्या प्रत्येक सैनिकाचा आहे. देश आहे तर मी आहे, हा सन्मान माझ्या देशाचा आहे. देशासाठी लढावं, देशासाठी मरावं, सन्मानान जगावं हेच माझं उद्दीष्ट आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी होण्याचं मुख्य कारण एयर डिफेन्स होतं. आमच्या देशवासीयांच कुंकु पुसणाऱ्यांना 'ऑपरेशन सिंदूर' हे उत्तर होत असे उद्गार सुभेदार मेजर संजय सावंत यांनी काढले. तसेच प्रत्येक मातेनं जिजाऊ बनलं पाहिजे, तरच शिवराय निर्माण होतील असं मत व्यक्त केलं. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून गुरूकुल येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी करणारे सुभेदार मेजर संजय सावंत हे सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे सुपुत्र आहेत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे कौतुक केले होते. पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती. भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स युनिटनी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या नेतृत्वाखालील युनिटने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचे ४५ ड्रोन आणि २ क्षेपणास्त्रांचे हल्ले आकाशातच उध्वस्त करत पाडले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशाचे संरक्षण मंत्र्यांनी सुभेदार मेजर यांच्या टीमचे कौतुक करीत शाबासकीची थाप दिली होती. आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून व गुरूकुलच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. देशासाठी लढलेल्या भुमिपुत्राचा आम्हाला अभिमान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सिंदूर ऑपरेशनवेळी सुभेदार मेजर यांना बोलावणं आलं तेव्हा ते सावंतवाडीत होते. सैन्यानं बोलवताच ते तातडीने निघाले. त्यावेळी माझा मित्राला सहीसलामत परतूदे अशी प्रार्थना केली होती. अन् आज ते सुखरूप परतलेत. देशवासियांना अभिमान वाटेल असं कार्य त्यांनी केलं आहे असे गौरवोद्गार श्री. साळगावकर यांनी काढले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे, मनोज घाटकर, दीपक सावंत, रवी राऊळ, रत्नाकर माळी, उमेश खटावकर, दत्तू नार्वेकर, बंड्या तोरसकर, लवू पार्सेकर, मंगेश गोसावी, अजित सावंत, सत्यवान साईल आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सुभेदार मेजर पुढे म्हणाले, माझे यापूर्वीही अनेक सत्कार झाले. मात्र, माझ्या जन्मभूमीत झालेला सन्मान माझ्यासाठी विशेष आहे. मी आरपीडीत शिकलो, वासुदेव गोसावी, व्ही.बी. नाईक सर आमचे गुरुवर्य आहेत. माझे वडील, भाऊ सैनिक आहेत. आमची भूमी शौर्य भूमी असून छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांची ही भूमी आहे. सावंतवाडीतील राजांनाही सैन्यदलाचा इतिहास आहे. त्यांनी अनेक सैनिक देशाला दिले. त्यामुळे आजच्या पिढीनं तो आदर्श ठेवत आपलं काम निष्ठेनं केलं तर देशाचं कल्याण होईल असा विश्वास व्यक्त केला. तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी होण्याचं मुख्य कारण एयर डिफेन्स होत. आमच्या दहा मीटर अंतरावर शत्रु सैन्याचा एक ड्रोन पडला. मात्र, सुदैवाने आम्ही त्यातून बचावलो. पहेलगाम हल्ल्यानंतर आम्ही झोपलो नाही, शत्रूला पुरून उरलो. येथील देव देवतांचा आशीर्वाद, आम्ही घेतलेलं कठोर प्रशिक्षण अन् परिश्रम यामुळेच यशस्वी झालो. संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केल तेव्हा, सीज फायरआधी अजून चार तास दिले असते तर शत्रूला आम्ही काय आहोत हे दाखवलं असतं अस मी म्हणालो होतो. यावर ''मरहट्टे हटते नहीं !'' असं मंत्री सिंह म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. मी सावंतवाडीचा सुपुत्र आहे याचा मला अभिमान आहे. माझी नाळ इथल्या माणसांची जोडलेली आहे. राष्ट्र प्रथम मानणारा मी सैनिक आहे अस मत श्री. सावंत यांनी व्यक्त केले.