कोऱ्या पाटीवर अक्षरे उमटताना...

Edited by: ब्युरो
Published on: July 21, 2024 12:19 PM
views 821  views

'' हमें टीचर 'टीचर' नही लगती, सब हमारी माँ जैसी है |''

जिल्हा परिषदेच्या एका प्रशालेतील परप्रांतीय विद्यार्थीनीचे हे भाष्य आहे.  अजिबात अक्षरओळख नसलेल्या तीन भावंडांची चिमुकली पाऊले एका शाळेच्या आवारात रांगू लागली. शिक्षकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना आपलीशी केली. ही बालमने शैक्षणिक वातावरणाशी समरस झाली, आणि एका वर्षात ती उत्तम वाचन-लेखन करु लागली. अंकगणिते सोडवू लागली.साक्षर झाली. सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागली. सरकारचे सर्व शिक्षा अभियान किती महत्त्वाचे आहे, हे अप्रत्यक्षपणे या मुलांनी दाखवून दिले.  आवडीने अभ्यास करुन गुरुजनांच्या हृदयात जागा मिळविण्याइतकी अनमोल गुरुदक्षिणा विद्यार्थी जीवनात याहून दुसरी असू शकत नाही.  

   सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १, न्हावेली या प्रशालेतील तीन परप्रांतीय भावंडांनी त्यांना मिळालेल्या शिक्षणाच्या संधीचे अक्षरश: सोने केले.  त्यांचा अवघा एक वर्षाचा शैक्षणिक प्रवास चकीत करणारा आहे.  पार्वती, मधू व दीनबंधू अशी या तिघांची नावे आहेत. त्यांचे वडील सत्येंद्र भारद्वाज हे बांधकाम क्षेत्रात रोजंदारी करतात. त्यांना एकूण पाच मुले असून सर्वात छोटी मुलगी अवघ्या काही महिन्यांची आहे. 

या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता रवींद्र नाईक या सन २०२३-२४ या वर्षी पहिलीत दाखल झालेल्या मुलांच्या घरी गृहभेटीसाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत शिक्षण विस्तार अधिकारी सौ. साळगावकर मॅडमही होत्या.  त्यावेळेस शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सेजल धवण यांनी त्यांना गावात ६ ते १४ वर्षे वयोगटातील परप्रांतीय मुले राहण्यास आली असल्याचे सांगितले. लगेचच त्यांनी या मुलांची भेट घेतली. त्यांची भाषा भोजपुरी होती. पुराव्यादाखल मुलांच्या आईने त्यांना स्वत:चे  आधारकार्ड दाखविले. त्यावरुन ते कुटुंब उत्तर प्रदेशमधील 'बलिया' जिल्ह्यातील असल्याचे समजले. यातील मोठी मुलगी पार्वती पहिलीच्या इयत्तेत तेथील शाळेत केवळ दाखल झाली होती, परंतु वडिलांच्या फिरत्या कामामुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण झाले नाही. ही मुले शाळेपासून पूर्णपणे वंचित असल्याचे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले.  ''आप पाठशाला में आएंगे क्या ?'' असा प्रश्न विचारताच मुलांचे चेहरे उजळले.   त्यानंतर त्यांच्या वडिलांशी चर्चा केली.  त्यांच्या परिस्थितीमुळे मुलांना शिक्षण देणे त्यांना शक्य नव्हते. आम्ही आपल्यासोबत आहोत, मुलांना शिकू द्या, असे सांगितल्यावर मुलांना शाळेत पाठविण्यास ते तयार झाले. मुख्याध्यापिकांनी विस्तार अधिकारी व  सहकारी शिक्षकांशी चर्चा केली. शिक्षण हक्क कायद्यानुसार ही मुले ६ ते १४ वयोगटातील होती. या मुलांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. त्यांना शाळेत दाखल करुन घ्यायला हवे, असे या चर्चेतून पुढे आले. 

परंतु या मुलांच्या जन्मतारखेचे पुरावे उपलब्ध नसल्याने 'वयानुरुप प्रवेश' या सदराखाली तिन्ही मुलांना त्या-त्या वयोगटात दाखल करुन घेण्यात आले. अशा पद्धतीने पार्वतीला पाचवीत, दीनबंधूला दुसरीत व सात वर्षाच्या मधूला पहिलीत दाखल करुन घेण्यात आले.  कोणीही मूल शिक्षणापासून वंचित  राहू नये, याकरिता सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार या मुलांना शाळेत वयानुरूप प्रवेश मिळाला.

शाळेत येण्यापूर्वी या मुलांचा वेश पार गबाळा होता. अंगावर अगदीच खराब कपडे, विस्कटलेले केस अशा अवस्थेत ही मुले होती.  पहिल्याच दिवशी ती शाळेत आली तेव्हा त्यांचे चेहरे पार बुजरे होते. ती बावरलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न उमटलेले दिसत होते. त्यांना काय करावे काही कळत नव्हते. परंतु, सर्व शिक्षकांनी त्यांना प्रेम दिले. ही मुले आपली आहेत, त्यांना समजून घेतले पाहिजे, हे इतर मुलांना समजावून सांगितले. पहिला पूर्ण महिना या मुलांना समजून घेण्यातच गेला.  सर्वात पहिली अडचण भाषेची होती. सर्व शिक्षिका त्यांच्याशी हिंदीतून बोलू लागल्या. गंमत म्हणजे या मुलांना मालवणी, मराठी शिकावेसे वाटत होते. शाळेतील इतर मुलेसुद्धा त्यांच्याशी हिंदीतून बोलू लागली होती. मुलांमध्ये राहून मोठी पार्वती आता मराठी बोलू लागली आहे, हे विशेष ! आता मालवणी, मराठी आणि हिंदी भाषेमध्ये या शाळेतील मुलांचा किलबिलाट ऐकू येतो. 

शिक्षकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही मुले ऐकतात. त्याप्रमाणे आचरण करतात. शाळेतील शिक्षिकांवर त्यांचे प्रेम आहे, त्यांच्याविषयी मनात अपार आदर आहे, हे त्यांच्या वागण्याबोलण्यातून दिसते.  अभ्यास करणे त्यांना आवडते. रिकामा वेळ मिळेल तेव्हा ती अभ्यास करतात. छोटी मधू व दीनबंधू अवघ्या एका वर्षात मराठी वाचन करु लागले आहेत. त्यांचे अक्षरसुध्दा वळणदार आहे. अंकगणिते सुद्धा ती सोडवितात. त्यांच्या वागण्यात, राहण्यात टापटीपपणा आला आहे.  तो त्यांच्या वह्यांमध्येही दिसतो.  शाळेतील कामातही ही मुले आनंदाने पुढे असतात. दीनबंधूची चित्रकलासुद्धा उत्तम आहे. शिवाजी महाराजांचे चित्र, निसर्गचित्रे त्याने सुरेख रेखाटली आहेत. शाळेत झालेल्या हस्ताक्षर स्पर्धेतही ही मुले अव्वल आली. ही मुले खरेच निरागस आहेत. 

मोठ्या पार्वतीची तर गोष्टच आगळी आहे. ती शाळेत दाखल झाली तेव्हा वयानुरुप पाचवीत बसत होती.  तिला शाळा, शिक्षक आणि अभ्यास फार आवडतो. अभ्यासाचे महत्तव ती जाणते. मनापासून अभ्यास करते. शाळेत येऊन लेखन-वाचन करु लागल्यावर तिने स्वत:च्या निरक्षर आईला स्वाक्षरी करण्यास शिकविले. अंगठा लावणारी तिची आई आता सही करते. सरस्वती पूजनाच्या वेळी पार्वतीने केलेले भोजपूरी नृत्य पाहून सगळेचजण अवाक् झाले. तिलासुद्धा चित्रकला आवडते. संत ज्ञानेश्वर माऊलींचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे  तिने काढलेले चित्र पाहिले की क्षणभर अंतर्मुख व्हायला होते. शाळेत झालेल्या रांगोळी स्पर्धेत या मुलीने बक्षीस पटकावले. हस्ताक्षर स्पर्धेतही या मुलीने बक्षीस घेतले. ती रंगकामसुद्धा करते.  

काही महिन्यांपूर्वी तिच्या धाकट्या बहिणीच्या जन्मावेळी तिच्या आईचे 'सिझरीअन' झाले. त्यांची काळजी घेण्यासाठी घरात मोठे माणूस कोणीही नव्हते. ती शाळेत येत का नाही, हे पाहण्यासाठी मुख्याध्यापिका व सहकारी शिक्षिका तिच्या घरी गेल्या. त्यावेळेस पार्वतीला पाहून त्या थक्क झाल्या. पार्वतीच्या लुकलुकत्या डोळ्यात  छोट्या बहिणीविषयीचे प्रेम ओसंडून वाहत होते.  ती तिच्या आईची 'आई' होऊन कामे करीत होती. केरकचरा काढणे, भांडीकुंडी-कपडालत्ता धुणे, जेवण बनविणे इथपासून आईची व बाळाची सर्व सेवा करीत होती. एवढेच नाही तर छोट्या बहिणीला तेलाने मसाज करीत होती, तिला आंघोळ घालत होती. शिक्षकांना घरी आलेले पाहताच तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ती त्यांना सांगत होती, '' मॅम, आप आयेंगे ये पहले मालूम होता तो मै आपके लिए कुछ बना देती | मुझे कुछ-कुछ बनाना आता है |'' 

यावर्षी पार्वती सहावीत आहे. पहाटे चार वाजता ती उठते. जेवण बनवते, कपडे धुते.  पाठच्या भावंडांना शाळेसाठी तयार करुन स्वत: तयार होते, आणि त्यांना घेऊन शाळेत येते. तिचे भावंडांवर प्रेम आहे. संध्याकाळी घरी गेल्यावरही कामे असतात.  तिची ही भावंडे तिला मदत करण्यासाठी जातात. तेव्हा ती म्हणते, ''तूम अच्छी तरह से पढाई करो |''

संध्याकाळी शाळा सुटल्यावर सर्वात शेवटी शिक्षक जाताना ही मुले घरी जाण्यास निघतात. शिक्षिकांना आपण डबा, आपल्या वस्तू घेतलात का, सर्व दरवाजे-खिडक्या लावल्या आहेत का, काही काम राहिले आहे का, असे विचारुन मग निघतात. शाळेतील उपक्रमांविषयी या मुलांना फार कुतूहल असते. 

आता ही मुले त्यांच्या मूळ गावी जाणार आहेत. त्यांचे शिक्षण मध्येच थांबू नये, अशी शाळेतील शिक्षकवृंदाची कळकळ आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व व या मुलांची शिकण्याची असलेली तळमळ पटवून दिली आहे. ते सुद्धा शिक्षणाबाबत अनुकूल आहेत. 

मात्र, सिंधुदुर्गातील एका वर्षाच्या वास्तव्यात ही तिन्ही मुले उत्तम प्रकारे लिहिण्या-वाचण्यास, गणिते सोडविण्यास शिकली आहेत. इंग्रजीची मुळाक्षरे, स्पेलिंग्ज समजू लागली आहेत.  उत्तर प्रदेशमधील ही गोड, निरागस बालके सिंधुदुर्गातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत साक्षर झाली आहेत. ही सारी मोफत शिक्षण हक्काची व माध्यान्ह भोजन योजनेची किमया आहे.   

संपूर्ण साक्षरतेसाठी देश पातळीवर 'सर्व शिक्षा अभियान' हा शासकीय उपक्रम राबविला जात आहे.  या अनुषंगाने, ज्या मुलांना अक्षरांचा-अंकांचा गंधही नाही, मराठी भाषा ज्यांना अवगत नाही, अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना साक्षर बनविण्याचे इंद्रधनुष्य मुख्याध्यापिका सौ. स्मिता नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिक्षिका सौ. सुधा देवण, सौ. सरोज नाईक व सौ. सुषमा पुळासकर या सहकारी शिक्षिकांनी पेलले.  स्थानिक व परप्रांतीय मुलांमध्ये सुरेख मेळ घडवून आणला. सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, बीआरसी सावंतवाडी,  पालक-शिक्षक समितीच्या अध्यक्षा, सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांनी त्यांना प्रोत्साहनाचे बळ दिले.  आवडीने अभ्यास करुन परप्रांतीय मुलांनी या शिक्षिकांना अमिट समाधान दिले, व त्यांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले. .

सौ. मंगल नाईक-जोशी