आरवलीतील बुलेट चोरट्यास वेंगुर्ले पोलिसांकडून अटक

Edited by: दिपेश परब
Published on: November 27, 2025 20:51 PM
views 48  views

वेंगुर्ले : आरवली देऊळवाडी येथून चोरीस गेलेल्या रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट च्या चोरट्यास काल बुधवारी वेंगुर्ले पोलीस पथकाने २४ तासात गजाआड केले. रेडी हुडावाडी तिठ्यावर चंदन सुहास परुळेकर(२५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या संशयिताने पोलीसांकडे कबुली दिली. आज वेंगुर्ला न्यायालयात त्याला हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आरवली देऊळवाडी येथील इलेक्ट्रिक सामान असलेल्या गोडाऊन जवळ आरवली उपसरपंच किरण जनार्दन पालयेकर यांनी हँडल लॉक करून ठेवलेली सुमारे १ लाख १० हजार किमतीची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट २४ नोव्हेंबर रोजी चोरीस गेली होती या प्रकरणी दिनांक २५ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाच्या आत सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहिती याच्या आधारे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारिवयांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रसाद कदम, स्वप्नील तांबे व योगेश राहुळ यांच्या पथकाने रेडी हुडावाडी येथे आरोपी चंदन परुळेकर याला ताब्यात घेतले. आरोपीने चोरून नेलेली बुलेट गाडी ताब्यात मिळण्यासाठी न्यायालयाकडे आरोपीस हजर करताना पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे एक दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रसाद कदम करत आहेत.