
सण-उत्सव म्हटला की आनंद, उत्साह आणि जल्लोष आलाच…मात्र हा जल्लोष इतरांसाठी त्रासदायक ठरू नये, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सण साजरे करताना परंपरा आणि आनंद जपतानाच ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे ‘सण साजरे करूया आनंदाने, पण ध्वनीप्रदूषण नकोच!’ हा संदेश अंगीकारत यंदाचा उत्सव शांततामय, आनंददायी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करूया.
डीजे आणि मोठ्या लाऊडस्पीकरचा वापर टाळणे: मिरवणुका किंवा कार्यक्रमांमध्ये कानठळ्या बसवणाऱ्या डीजेऐवजी पारंपरिक आणि सुखद वाटणाऱ्या वाद्यांचा वापर करावा.
ध्वनीची मर्यादा पाळणे : शासनाने ठरवून दिलेल्या डेसिबल (dB) मर्यादेचे आणि वेळेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. दिवाळी किंवा इतर सणांना मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणे टाळावे. यामुळे केवळ ध्वनीप्रदूषणच नाही, तर मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषणही होते.
गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो, दहीहंडी असो किंवा अन्य कोणताही धार्मिक-सामाजिक उत्सव - महाराष्ट्राची उत्सव प्रियता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. ढोल-ताशांचा निनाद, आरती, भजन, मिरवणुका आणि भक्तिमय वातावरण यामुळे सणांना वेगळेच चैतन्य प्राप्त होते. मात्र गेल्या काही वर्षांत उत्सव आणि ध्वनीप्रदूषण यातील सीमारेषा अनेकदा धूसर होताना दिसत आहे.
आज प्रश्न केवळ “ डीजे - डॉल्बी लावायचा की नाही ?” एवढाच राहिलेला नाही. खरा प्रश्न आहे- आपल्या आनंदासाठी दुसऱ्याच्या शांततेचा आणि आरोग्याचा बळी द्यायचा का? सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवातील डीजे आणि मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टिमवरून चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. काही ठिकाणी 'नो डीजे, नो डॉल्बी'ची मागणी होत आहे, तर दुसरीकडे उत्सव साजरा करण्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दाही मांडला जात आहे.
धार्मिक उत्सव महत्त्वाचा, पण नागरिकांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे ध्वनी हा उत्सवाचा भाग असू शकतो, मात्र कर्णकर्कश आवाज हा संस्कृतीचा भाग होऊ शकत नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, रुग्णालयातील रुग्ण, विद्यार्थी, परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच प्राणी-पक्ष्यांवर मोठ्या आवाजाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे “आमचा उत्सव, आमचा आवाज” ही भूमिका लोकशाही समाजाला शोभणारी नाही.
रुग्णालये, शाळा, न्यायालये आदी शांतता क्षेत्रांमध्ये विशेष दक्षता घ्यावी. नियम मोडणाऱ्या मंडळांवर केवळ दंड न करता पुढील परवानगीबाबतही कठोर भूमिका घ्यावी. पोलिस, स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी उत्सवाच्या काळात संयुक्त पथके नेमावीत. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन / ऑनलाइन व्यवस्था करावी.
उत्सवाची उंची डेसिबलमध्ये मोजू नका ! गणेशोत्सव म्हणजे भक्ती. दहीहंडी म्हणजे उत्साह. नवरात्र म्हणजे श्रद्धा. ईद, ख्रिसमस, मोहर्रम, बुद्धजयंती किंवा इतर धार्मिक-सामाजिक उत्सव म्हणजे आपल्या विविधतेचा उत्सव. म्हणून धर्म कोणताही असो, नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. आज एका धर्माच्या उत्सवातील मोठ्या आवाजाकडे दुर्लक्ष करून उद्या दुसऱ्या धर्माच्या उत्सवावर नियम लावले गेले, तर सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे “सर्व धर्मांसाठी समान ध्वनी नियम” हाच योग्य मार्ग आहे.
गणेश मंडळे आणि उत्सव आयोजकांनी प्रशासनाच्या कारवाईची वाट पाहण्याऐवजी स्वतःहून आदर्श निर्माण करण्याची गरज आहे. “आमचा उत्सव - आमची जबाबदारी” ही भावना प्रत्येक मंडळाने स्वीकारली पाहिजे. कमी आवाजातही सुंदर आरती होऊ शकते. मर्यादित आवाजातही मिरवणूक उत्साहात निघू शकते. डीजेचा आवाज कमी झाला म्हणून भक्ती कमी होत नाही आणि डॉल्बीचा आवाज वाढला म्हणून श्रद्धा वाढत नाही.
डीजे - डॉल्बीवर पूर्ण बंदी असावी की कायदेशीर ध्वनीमर्यादेत त्याचा वापर करावा, यावर मतभेद असू शकतात. मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे - कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे; पण दुसऱ्याला त्रास न देण्याची जबाबदारीही आहे. म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे.
" डीजेचा विरोध नाही: कर्णकर्कश आवाजाचा विरोध आहे!” “धर्म जपूया, परंपरा जपूया; पण नागरिकांची शांतताही जपूया!” यंदाचा गणेशोत्सव असा असावा की मंडपात भक्तीचा आवाज घुमावा, पण परिसरात त्रासाचा नाही. कारण खरा उत्सव तोच- जिथे गणरायाचे स्वागत जल्लोषात होते आणि निरोपही समाजाच्या शांततेचा आदर राखून दिला जातो.
लक्ष्मण आडाव
(उप संपादक, दै. कोकणसाद)














