
सावंतवाडी : ऐन गणेशोत्सवात बँकांचा संप अन् त्यात विकेंडमुळे ग्राहकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत असताना सिंधुदुर्ग जिल्हा बँक मदतीला धावून आली आहे. कोकणचा सण म्हणून ओळख असलेल्या गणेशोत्सवात जिल्हा बँकेच कामकाज उद्या देखील नियमित वेळेत सुरू राहणार असून जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्याकडे यासाठी मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली होती.
याबाबत श्री. मराठे यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा कोकणच्या लोकांसाठी जिव्हाळ्याचा सण असून यावेळी वेळप्रसंगी कर्ज काढून इथला गणेशभक्त उत्सव साजरा करतो. मात्र, नॅशनलाईज बँका बंद असल्याने अनेकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून याबाबत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे लक्ष वेधले. यानंतर त्यांनी तात्काळ निर्णय घेत उद्याही जिल्हा बँक सिंधुदुर्गवासियांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल असे सांगितल्याचे श्री. मराठे यांनी स्पष्ट केले. यामुळे मोठा दिलासा सिंधुदुर्ग वासियांना मिळाला असून एक चेअरमन मनिष दळवी तसेच जिल्हा बँक अधिकारी, कर्मचारी वर्गाचे आभार मानण्यात येत आहेत.











