आर्थिक अस्थिरता सिंधुदुर्गातील वाढत्या आत्महत्येचं कारण ?

Edited by: दिपेश परब
Published on: April 09, 2025 11:00 AM
views 192  views

सिंधुदुर्ग...हा जिल्हा आज एका भयानक संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून इथे आत्महत्येचे प्रमाण अचानक खूप वाढलं आहे . गेल्या 2-3 महिन्यांत माझ्याच ओळखीतील तब्बल 4-5 जणांनी गळफास घेऊन जीवन संपवलंय. आणि काल-परवा तर सावंतवाडीच्या एका पोलीस कर्मचाऱ्यानेही असाच टोकाचा निर्णय घेतला. 

गेल्या काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण भयानकरीत्या वाढले आहे. ही चिंताजनक परिस्थिती सामाजिक, आर्थिक आणि मानसिक आरोग्याच्या विविध समस्यांचे द्योतक आहे. कोणी या मुलांना फसवलं होतं का, की ही मुलं कोणत्या ऑनलाईन प्रकरणात अडकली होती का, या सर्वांची माहिती घेऊन  त्यावर प्रभावी उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे. 

सिंधुदुर्ग हा  एक निसर्गसंपन्न जिल्हा असला तरी येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी आणि पर्यटनावर अवलंबून आहे. शेतीतील उत्पन्न अनिश्चित, मासेमारीवर नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव आणि पर्यटनातील हंगामी स्वरूप यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळत नाही. तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, शिक्षण घेऊनही रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने निराशा निर्माण होते. ही आर्थिक अस्थिरता आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाला कारणीभूत ठरू शकते.

येथील बहुतांश भाग हा ग्रामीण आहे, आणि ग्रामीण भागात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता कमी आहे. तणाव, नैराश्य किंवा कौटुंबिक समस्यांवर मोकळेपणाने बोलण्याची संस्कृती इथे फारशी रुजलेली नाही. मानसिक आजारांना सामाजिक कलंक मानले जाते, ज्यामुळे लोक मदत मागण्यास संकोच करतात. परिणामी, व्यक्ती एकटेपणातून आणि असहायतेतून आत्महत्येकडे वळू शकतो.

गोवा जवळ असल्याने दारू किंवा इतर नशेच्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अनेक तरुण मुलं नशेच्या आहारी गेलेले दिसतात,  नशेच्या आहारी गेल्याने ही  मुलं आर्थिक संकटात सापडतात आणि त्यातूनही आत्महत्येसारखा मार्ग निवडू शकण्याची शक्यता आहे. स्थानीक पातळीवर आत्महत्येच्या घटनांचा तपास करून त्यामागील कारणांचा अभ्यास करून  त्यानुसार धोरणे आखणं फार गरजेचं आहे. 

शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी मानसिक आरोग्याबाबत जागरूकता मोहिमा राबवाव्या लागतील. लोकांना तणाव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण द्यावे लागेल.हेल्पलाइन क्रमांक आणि ऑनलाइन समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिल्यास यात थोडा फार फरक पडू शकतो. सरकार, स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागले. प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याची आशा आणि आधार देणे हाच खरा याववर उपाय ठरेल. जर या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या, तरच या भयानक संकटावर मात करणे शक्य होईल.


सचिन आमुणेकर