कार - दुचाकी अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 18, 2025 19:49 PM
views 196  views

कणकवली : मुंबईहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव  कारने समोरील दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार चंद्रकांत कृष्णाजी फोंडके (६८,रा. फोंडाघाट) हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णवाहेतून कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील दळवी कॉलेज समोरील शिडवणे फाटा येथे शनिवार दुपारी  १२. १५ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक हेमंत सुरेश रेमाणाचे (३२, रा. बेळगाव, कर्नाटक ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चंद्रकांत फोंडके हे होलसेल व्यापारी आहेत. शनिवारी ते फोंडाघाट येथून तळेरे येथील व्यापाऱ्यांकडून मालाचे पैसे आणण्यासाठी दुचाकी घेऊन गेले होते.  व्यापाऱ्यांकडून वसुली करून मुंबई-गोवा महामार्गावरून फोंडाघाटकडे येण्यास निघाले. त्याचवेळी गणपतीपुळे येथून देवदर्शन करून महामार्गावरून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला मागावून जोरदार धडक दिली. या धडकेत चंद्रकांत फोंडके हे जखमी झाले. 

अपघाताची माहिती मिळतात पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धावी घेतली. त्यावेळी अनिवाश डंबे यांनी चंद्रकांत फोंडके यांचे नातेवाईक दिलीप फोंडके यांच्याशी संपर्क साधून अपघातात चंद्रकांत जखमी झाल्याचे सांगितले. अपघातग्रस्त चंद्रकांत यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणत असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. 

याबाबत दिलीप भिकाजी फोंडके यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालक हेमंत रेमाणाचे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.