LIVE UPDATES

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सभेत स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून वाद

पाणीटंचाई, डेंग्यू, अतिक्रमणाचे मुद्देही गाजले; खुल्या जागांवरील अतिक्रमणांवर महिनाभरात कारवाईचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 06:27 PM
views 66  views

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून वाद निर्माण झाला. नगरसेविका प्रणाली माने यांनी अभियानाच्या खर्चाचा लेखी हिशोब आणि कॅशबुकच्या छायांकित प्रती न मिळाल्याबाबत प्रशासनाला जाब विचारला. कॅशबुकमध्ये घोटाळा असल्यामुळेच प्रती दिल्या जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही माहिती लपवली जात नसल्याचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी स्पष्ट केले. याशिवाय शहरातील पाणीपुरवठा, डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येची चिंता, खुल्या जागांवरील अतिक्रमणे आणि अस्वच्छतेच्या प्रश्नांवरही सभेत चर्चा झाली.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष मिताली सावंत, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, स्वच्छता सभापती निवृत्ती तारी, मुख्याधिकारी हरिदत्त माने यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

 पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी साहित्य खरेदीला मंजुरी

देवगड-जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबाव योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उर्वरित पाइपलाइनचे काम भूमिगत स्वरूपाचे असल्याने शहरातील पाणीपुरवठा अनियमित होत असल्याचे पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी सांगितले. सध्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केले नाही, तर एप्रिल-मे महिन्यांत पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली.

 स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून प्रणाली माने यांचा सवाल

१९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाच्या खर्चाचा मुद्दा सभेत चर्चेला आला. या अभियानाचा खर्च कशा पद्धतीने करण्यात आला, याचा लेखी हिशोब मागूनही तो का देण्यात आला नाही, असा सवाल नगरसेविका प्रणाली माने यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी मागितलेल्या माहितीच्या छायांकित प्रतींसाठी शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. प्रशासनाने लोकप्रतिनिधींना केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेऊ नये, असेही त्या म्हणाल्या. कॅशबुकमध्ये घोटाळा असल्यामुळेच त्याच्या प्रती दिल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

यावर नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छता अभियानासाठी १ लाख ३५ हजार रुपयांची जमा नोंद असून, त्यापैकी १ लाख २१ हजार १३० रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट केले. खर्चाच्या मर्यादेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी पाच हजार रुपयांच्या आतील रक्कम खर्च करता येत असल्याचे सांगितले. प्रशासन कोणतीही माहिती लपवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर सभागृहात बराच वेळ चर्चा झाली.

सुका कचरा विक्री आणि मशीन भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

‘मे. ओम साई स्क्रॅप रिसायकलिंग’ संदर्भातील सुका कचरा विक्री तसेच नगरपंचायतीची मशीन भाड्याने देण्याच्या प्रस्तावावर सभेत चर्चा झाली. चर्चेनंतर या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

शाळेला निधी देण्यावरून अन्य शाळांच्या समावेशाचा मुद्दा

श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल येथे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक निधी देण्याचा विषय सभेत मांडण्यात आला. यावेळी नगरसेवक नितीन बांदेकर यांनी केवळ एका शाळेच्या कार्यक्रमाला निधी दिल्यास अन्य शाळांवर अन्याय होऊ शकतो, अशी भूमिका मांडली. चर्चेनंतर संबंधित कार्यक्रमासाठी निधी देण्यास मंजुरी देण्यात आली.

फिश मार्केटसाठी जुन्या भाजी मार्केटची जागा निश्चित

देवगड खालची बाजारपेठ येथील जुन्या भाजी मार्केटच्या जागेवर फिश मार्केट उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती सभेत देण्यात आली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत शहरातील आठवडा बाजार परिसर आणि निर्मला देवी मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालये उभारणे, पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था करणे तसेच हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र, नवीन शौचालये उभारण्याबरोबरच जुन्या शौचालयांच्या दुरवस्थेकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी केली.

डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता

देवगड-जामसंडे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचा मुद्दा नगरसेवक नितीन बांदेकर यांनी उपस्थित केला. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील आरोग्यविषयक परिस्थिती गांभीर्याने घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

खुल्या जागांवरील अतिक्रमणांवर महिनाभरात कारवाई

शहरातील खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याचा मुद्दा नगरसेवक संतोष तारी यांनी उपस्थित केला. या अतिक्रमणांवर प्रशासन कोणती कारवाई करणार, असा सवाल त्यांनी केला. त्यावर मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी एका महिन्याच्या आत अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

ग्रामीण भागातील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

नगरपंचायत क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अस्वच्छता असल्याचा तसेच काही कर्मचारी दुपारनंतर प्रभागात फिरकत नसल्याचा आरोप स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी केला. यावर मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे द्यावीत. संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

या सर्वसाधारण सभेत स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून प्रशासनाला विचारण्यात आलेला जाब, संभाव्य पाणीटंचाई, डेंग्यू प्रतिबंध, अतिक्रमण निर्मूलन आणि शहरातील विविध विकासकामे हे प्रमुख मुद्दे चर्चेत राहिले. काही विषयांवर सदस्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले, तर काही विकासकामांना सभागृहाने मंजुरी दिली.