
कणकवली : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक हे आज शनिवार २५ एप्रिल व उद्या रविवार २६ एप्रिल अशा दोन दिवसीय सिंधुदुर्ग दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते देवगड, कणकवली आणि मालवण येथील विविध कार्यक्रमांना भेटी देणार असून यात कणकवली येथे होत असलेल्या भाजप पदाधिकारी मेळाव्याचाही समावेश असल्याची माहिती भाजप युवामोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिली आहे.
महाडीक आज शनिवारी सायंकाळी ५ वा. देवगड येथे दाखल होणार असून त्यांचे भाजप कार्यालय येथे स्वागत करण्यात येणार आहे. ५.३० वा. ते माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरी भेट देणार आहेत. ६ वा. देवगड पचनचक्की गार्डनची पाहणी तर रात्री ८ वा. युथ फोरम देवगड नाट्यमहोत्सवास भेट देणार आहेत.
महाडीक रविवारी सकाळी ९.३० वा. श्री. देव कुणकेश्वराचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते कणकवलीच्या दिशेने रवाना होतील. १०.३० वा. त्यांचे कणकवलीतील छ. शिवाजी महाराज चौक येथे स्वागत करण्यात येणार आहे. ११ वा. महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील प्रहार भवन येथे भाजप पदाधिकारी मेळावा होणार आहे. दुपारी १ वा. ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. दुपारी ३ वा. मालवण येथे सिंधुदुर्ग किल्याची पाहणी करणार असून यावेळी पर्यटकांशी संवादही साधणार आहेत. सायंकाळी ५ वा. राजकोट किल्ल्याला भेट देणार असून ६ वा. मालवण येथील रॉक गार्डन येथे होणार असलेल्या 'कॉफी विथ इंफ्लूएंसर' या कार्यक्रमालाही भेट देणार आहेत. सर्व कार्यक्रमांना भाजप व युवामोर्चाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी केले आहे.










