
सावंतवाडी : तालुक्यात मोठे नुकसान झाले असून त्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. झालेल नुकसान मोठ असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू. जवळपास ६१ ठिकाणी नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार तसेच चौकटी बाहेर जावून देखील लोकांना आधार देऊ, आज आमच्या जनतेला आधाराची गरज आहे असे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी पालकमंत्री बोलत होते.
येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय व रामेश्वर प्लाझा येथे वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री नितेश राणे यांनी केली. नुकसानीची जास्ती जास्त भरपाई मिळण्यासाठी अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांना केले. यावेळी मंत्री श्री. राणे म्हणाले, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व टीम जनतेला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सरकार म्हणून आम्ही जनतेच्या पाठीशी आहोत. तसेच गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काढलेल्या गाळाचे काय करावे याचे धोरणही निश्चित आहे. एक-दोन ठिकाणी गैरसमज झाला असेल तर प्रशासनाची तशी प्रतिमा तयार करू नये, सर्वांमध्ये समन्वय असून पालकमंत्री म्हणून माझा लक्ष सर्वांवर आहे. गाळ काढत पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये याची दखल घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्यावर्षी तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. यावर्षीही गाळ काढत पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करणार !
तसेच धोकादायक झाडांसह इतर पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात करण्याची तयारी आहे. शासन म्हणून तशी पाऊल टाकलीत. महावितरणच कामात गेल्यावर्षीपेक्षा सुधारणा आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यात आला असून तो खर्चही होत आहे. १०० टक्के सुधारणा झाली अस नसल परंतु, टप्याटप्प्यात सर्व समस्या दूर होतील. कोणतीही कारण आम्ही देणार नसून भूमीगत वीज वाहिन्यांसाठीही प्रयत्न सुरू आहेत. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जेवढी मदत करू शकतो तेवढी मदत निकषात बसवून त्यांना करणार असल्याची माहिती मंत्री राणेंनी दिली.
जिल्ह्याला फायदा होईल असा 'शक्तीपीठ'मार्ग तयार
तसेच शक्तीपीठ महामार्गाबाबत बैठका झाल्या असून दीपक केसरकर यांनी केलेल्या सुचनांची दखल घेतली आहे. या मार्गाचा फायदा जिल्ह्याला कसा होईल ? ते बघीतल आहे. बांदा व इतर गाव बाधीत होणार नाहीत. त्यातून आम्ही मार्ग काढला असून नवीन मार्ग तयार केला आहे. रेडी पोर्टलाही तो जोडला जाणार आहे. कुठल्यातरी संघर्ष समितीने पत्र दिल्या सारखा राज्य सरकारचा कारभार चालत नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्याला फायदा होईल असा शक्तीपीठ महामार्ग तयार होईल असंही त्यांनी स्पष्ट केले.
रिक्तपद भरली जातील !
दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी डॉक्टर नेमण्यात येत आहेत. एमडी फिजीशीयन सावंतवाडीला देण्यात आला आहे. येणाऱ्या एप्रिल ते जून महिन्यात आरोग्य विभागातील इतरही रिक्तपद भरली जातील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवराज लखमराजे भोंसले, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जि.प. सदस्य विक्रांत सावंत, प्राचार्य डी.एल.भारमल, सभापती दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, प्रतिक बांदेकर, आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक उदय नाईक, दिलीप भालेकर, जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संतोष गांवस, संतोष मठकर आदींसह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.










