LIVE UPDATES

Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ’ महामार्गाला झोळंबे ग्रामस्थांचा एकमुखी तीव्र विरोध

पुर्वजांनी फुलविलेल्या बागायती उद्ध्वस्त करून कसला विकास करता? गणेशप्रसाद गवस यांचा प्रशासनाला सवाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 27, 2026 08:52 PM
views 19  views
Zolambe Villagers Protest Shaktipeeth Highway

दोडामार्ग : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला झोळंबे गावातून तीव्र विरोध होत असून, शुक्रवारी झालेल्या हरकतींच्या सुनावणीत ग्रामस्थांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. १२९ हरकतींच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत ग्रामस्थांनी विरोध करत हा प्रकल्प गावातून अजिबात होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका मांडली. तसेच ग्रामस्थांच्यावतीने प्रतिनिधित्व करणारे झोळंबे गावचे ग्रामस्थ, शिंदे शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख तथा दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी प्रशासनाला विविध मुद्द्यांवर जाब विचारत महामार्गाला कायम विरोध राहणार असल्याचे स्पष्ट केले.

शक्तीपीठ महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानिमित्त ग्रामस्थांना प्रशासनाने नोटीसा पाठवून शुक्रवारी झोळंबे येथील प्रशालेत आयोजित केलेल्या सुनावणीत हरकती व आक्षेप नोंदविण्यासाठी सूचना केल्या.

शुक्रवारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकवटले व त्यांनी सुनावणीत या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. यावेळी उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी प्रकल्पाला येथे अजिबात थारा देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली.

उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने झोळंबे गावचे ग्रामस्थ तथा उपसभापती गणेश प्रसाद गवस यांनी प्रकल्पाला विरोध दर्शवत ग्रामस्थांची बाजू मांडली. ते बोलताना म्हणाले, दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे, तळकट, कुंब्रल यांसह परिसरातील पाच-सहा गावांमधून तालुक्याच्या महसुली उत्पन्नातील सुमारे ५० टक्के उत्पन्न मिळते. याचे कारण म्हणजे या भागातील समृद्ध फळबागायती शेती. पिढ्यान्‌पिढ्या पूर्वजांनी कष्टाने फुलविलेल्या या बागायती आज येथील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहेत. मात्र शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामुळे हाच शेतीचा वारसा आणि संपूर्ण डोंगररांग उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे, असे गवस यांनी सुनावणीवेळी स्पष्ट केले.

गोव्यात पोर्तुगीज काळात सुपारी आणि अन्य फळबागायतींची लागवड सुरू झाली. त्यापासून प्रेरणा घेत येथील पूर्वजांनीही डोंगराच्या पायथ्याशी बागायती शेती विकसित केली. डोंगरातील नैसर्गिक झरे आणि पाण्याचे स्रोत यांचा उपयोग करून पाटांच्या माध्यमातून शेतीला पाणी पोहोचविले. टप्प्याटप्प्याने डोंगर उतारावर बागायती फुलविल्या. आजही येथील शेतकरी एखादे झाड तोडण्यापूर्वी अनेकदा विचार करतो. निसर्ग जपणाऱ्या या शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर आता महामार्गासाठी संपूर्ण डोंगरच नष्ट होण्याची वेळ आली आहे. हा विरोधाभास प्रशासनाने समजून घ्यावा, अशी भूमिका गवस यांनी मांडली.

फुकेरी धरणाच्या भवितव्याचाही प्रश्न

परिसरातील गावांची पाण्याची गरज भागविण्यासाठी फुकेरी येथे धरण मंजूर झाले असून, त्याचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे या धरणाच्या भवितव्याबाबतही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गवस यांनी व्यक्त केली.

डोंगरातील पाण्याचे स्रोत सुरक्षित राहिले तरच शेती आणि गावांचे अस्तित्व टिकणार आहे. महामार्गासाठी डोंगराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास त्याचे परिणाम भविष्यात शेती आणि पाणीपुरवठ्यावर होऊ शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

तिसऱ्यांदा मार्ग बदलल्याने शेतकऱ्यांत असंतोष!

प्रशासनाकडून या महामार्गाची दिशा तिसऱ्यांदा बदलण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सध्याच्या प्रस्तावित मार्गाला विरोध त्यांनी दर्शविला. या महामार्गाचा स्थानिक गावांना कोणताही ठोस फायदा होणार नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी, बागायती आणि उपजीविकेवर मोठा परिणाम होणार आहे. शेतकरी प्रशासनाकडे काही मागत नाही; परंतु प्रशासनच त्यांच्या हक्काची जमीन हिरावून घेण्याच्या प्रक्रियेत आहे असा विकास आम्हाला अजिबात मान्य नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

वृत्तपत्रातील नोटिशीमुळे अनेक शेतकरी अनभिज्ञ!

भूसंपादन प्रक्रियेची नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती; मात्र ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी नियमितपणे वृत्तपत्र वाचत नसल्याने अनेकांना या प्रक्रियेची माहिती मिळाली नाही. परिणामी, त्यांना विहित मुदतीत हरकती नोंदविता आल्या नाहीत, असा मुद्दाही गवस यांनी उपस्थित केला. त्यामुळे सध्या दाखल झालेल्या १२९ हरकती प्राथमिक स्वरूपात नोंदवून घ्याव्यात आणि उर्वरित शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्यासाठी काही दिवसांची अतिरिक्त मुदत द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवा

ग्रामस्थांच्या भावना केवळ सुनावणीपुरत्या मर्यादित न ठेवता त्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात. स्थानिकांची शेती, पर्यावरण, पाण्याचे स्रोत आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेला निसर्गाचा वारसा यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहनही गवस यांनी केले.


ताजी बातमी

View all

संविधानाची ताकद विधायक राष्ट्रनिर्माणासाठी वापरा : प्राचार्य समिर तारी
November 27, 2026
देवगडमध्ये व्यावसायिकांसाठी एफडीए परवाना नूतनीकरण विशेष कॅम्प
November 27, 2026
Kiran Waghmare Honoured for Sagarkavach Coastal Security Exercise
देवगडचे मत्स्यपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांचा राज्यस्तरीय गौरव
November 27, 2026
Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026
संबंधित बातम्या

View all

संविधानाची ताकद विधायक राष्ट्रनिर्माणासाठी वापरा : प्राचार्य समिर तारी
November 27, 2026
देवगडमध्ये व्यावसायिकांसाठी एफडीए परवाना नूतनीकरण विशेष कॅम्प
November 27, 2026
Kiran Waghmare Honoured for Sagarkavach Coastal Security Exercise
देवगडचे मत्स्यपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांचा राज्यस्तरीय गौरव
November 27, 2026
Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026