
देवगड : समुद्र हा केवळ पर्यटनाचा आणि निसर्गसौंदर्याचा ठेवा नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे देवगड तालुक्यातील सर्व १२ समुद्रकिनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकाची आहे. समुद्रकिनारे, पाणवठे, विहिरी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेत सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. देवगड येथे आयोजित बीच स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर 5.0’ या अभियानांतर्गत देवगड समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रमोद कामत यांनी स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनावर न सोपवता नागरिकांनीही त्यात सक्रिय सहभाग घेण्याची गरज व्यक्त केली. समुद्रकिनाऱ्यावर येणारा प्रत्येक पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांनी स्वच्छतेची काळजी घेतली, तर देवगडचे समुद्रकिनारे अधिक सुंदर, सुरक्षित आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, माजी आमदार अजित गोगटे, देवगड-जामसंडे नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य सोनवणे, तळवेकर, देवगड सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हरिदत्त माने, गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविका, सेवाभावी संस्था ग्रामस्थ तसेच देवगड कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर म्हणाल्या, १२ ते १९ सप्टेंबर या कालावधीत ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर 5.0’ अभियान विविध ठिकाणी राबविण्यात येत आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने या अभियानाचे सुंदर नियोजन करण्यात आले असून, स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व संस्था, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांचे त्यांनी आभार व्यक्त करत.
समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचा हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता, ही स्वच्छतेची सवय आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली पाहिजे. आपल्या परिसरातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. बासुर यांनी केले.
स्वच्छतेसोबत हरित देवगडचाही संदेश
दरम्यान, स्वच्छता अभियानासोबतच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा वृक्षभेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवगड बीच परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामुळे एका बाजूला समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचा आणि दुसऱ्या बाजूला परिसर हिरवाईने नटविण्याचा दुहेरी संदेश या अभियानातून देण्यात आला.
स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर परिसर आणि पर्यावरणपूरक देवगड अशी ओळख निर्माण करण्यासाठी प्रशासन, स्थानिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज या अभियानातून अधोरेखित झाली.










