
रत्नागिरी : गौरी-गणपतीचे आज विसर्जन होत असून यानंतर मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी एसटी विभाग सज्ज आहे. रत्नागिरी एसटी विभागातून अडीच हजारांहून अधिक एसटी फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी दिली.
लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर आता परतीच्या प्रवासाची ओढ लागलेल्या चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांना मुंबई, ठाणे, बोरिवली आणि पालघर भागात सुरक्षित व सोयीस्करपणे परत जाता यावे, यासाठी रत्नागिरी विभागाकडून १९ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत २,५०७ जादा बसेसचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.१९ रोजी २३७ फेऱ्या आरक्षित झाल्या आहेत. गणेश विसर्जन आणि उत्सवाच्या सांगतेनंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाचा मुख्य ओघ २० सप्टेंबरला असणार आहे. या एकाच दिवशी रत्नागिरी विभागातून सर्वाधिक १,६६१ जादा गाड्यांचे आरक्षण झाले आहे. त्यापाठोपाठ २१ सप्टेंबरला ४५७ बसेस सोडण्यात येणार आहेत. २३ सप्टेंबरला ५१, २४ ला १९, २५ ला १९, २६ ला २० व २७ रोजी २१ फेऱ्यांचे आरक्षण झाले असून यात वाढ होण्याची शक्यता आहे.
आगारनिहाय फेऱ्या
आगाराचे नाव एकूण फेऱ्या
मंडणगड १४७
दापोली २६३
खेड २३४
चिपळूण ४३३
गुहागर ४६०
देवरुख ३४५
रत्नागिरी २००
लांजा १८७
राजापूर २३८
रत्नागिरी २००
एकूण २५०७
“परतीच्या प्रवासादरम्यान प्रवाशांची गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी बस स्थानकांवर विशेष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व गाड्यांचे वेळेत नियोजन आणि सुरक्षित वाहतूक व्हावी, यासाठी एसटी प्रशासन दक्ष असून चाकरमान्यांनी अधिकृत आरक्षणाचा लाभ घेऊन सुरक्षित प्रवास करावा.”
-अश्वजित जानराव, विभाग नियंत्रक.










