LIVE UPDATES

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा स्तुत्य उपक्रम

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 19, 2026 16:52 PM
views 70  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ मध्ये विविध शैक्षणिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी ही शाळा दत्तक घेण्याचा संकल्प सोडला आहे.

जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी क्र. ४ मधील वाढती पटसंख्या आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक पद रिक्त असल्याने शिक्षकांवर प्रशासकीय कामांचा अतिरिक्त ताण येत होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनात व्यत्यय येऊ नये, तसेच शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात मुलांनी आपला लौकिक वाढवावा 

म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार दोन स्वयंसेविकांना नेमावे व त्याचे मानधन स्वतः द्यावे, असा शब्द ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिला होता. दिलेला शब्द पाळत त्यांनी नवनियुक्त स्वयंसेविका श्रीम. चुनेकर टिचर यांना स्वतःच्या हस्ते मानधनाचा धनादेश सुपूर्द केला.तसेच या शाळेत दुसऱ्या स्वयंसेविका श्रीमती सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे  तसेच पुढील संपूर्ण वर्षभराचे मानधन स्वतःच देणार असल्याचे जाहीर केले.

या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रगतीसाठी व सुरक्षेसाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली. शाळेच्या छताची दुरुस्ती करण्यात आली असून पोषण आहार धान्य गोदामासाठी स्वतंत्र केबिन उभारण्यात आली आहे. प्रगत तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी शाळेत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच बंद पडलेल्या मोठ्या टीव्ही स्क्रीनची दुरुस्ती करून ती पूर्ववत करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले गेले. शाळेची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून, भविष्यात ही शाळा एक स्वच्छ, सुंदर आणि गुणवंत विद्यार्थ्यांची 'आदर्श शाळा' म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

ॲड. अनिल निरवडेकर यांच्या या कौतुकास्पद पुढाकारामुळे आणि प्रत्यक्ष सहकार्यामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला मोठा हातभार लागणार आहे. याबद्दल सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. जि.प शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी व पटसंख्या कायम ठेवण्यासाठी असे उपक्रम प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदर्शानुसार यापुढे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.