LIVE UPDATES

संजय घोडावत विद्यापीठाच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी युवराज लखम सावंत-भोंसले

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने सत्कार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 12:25 PM
views 39  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ व श्रमिक विद्यार्थी ज्ञान सेवा संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांची संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूरच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याची आणि योगदानाची दखल या निवडीच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

युवराज लखमसावंत भोंसले हे मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर कार्यरत असून, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक असलेल्या तसेच पदवी ते पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रम राबविणाऱ्या श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. मुंबई विद्यापीठाचा ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कार तसेच नॅकची ‘A’ श्रेणी प्राप्त करणारे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच महाविद्यालयाला लीड कॉलेजचा दर्जाही प्राप्त झाला आहे.

बदलत्या शैक्षणिक गरजा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने महाविद्यालयाला अद्ययावत ठेवण्यासाठी युवराज लखमसावंत भोंसले सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच आयटी, कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी आधुनिक अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

या निवडीबद्दल श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने युवराज लखमसावंत भोंसले यांचा सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे सदस्य उपस्थित होते.