
2012 मधील दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या
दोडामार्ग : तालुक्यातील विर्डी वझर धबधबा येथे कर्नाटक हुबळी येथील एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुपारच्या सुमारास घडली. हुबळी येथून 7 पर्यटक जीवाची मौजमजा करण्याठी आले होते त्यातील विजय दौड्मणी वय 22 हा युवक खोल डोहात अंघोळ करत असताना बुडाला व त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे याच धबधब्या ठिकाणी 14 वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती आज घडली आहे. एक युवक याठिकाणी बुडाला होता आणि त्याची तब्बल सहा दिवसांनी बॉडी मिळाली होती. असे गेमस्थांनी सांगितले. आजच्या घटनेची माहिती दोडामार्ग पोलिसांना मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले ग्रामस्थांच्या व सोबत असलेल्या पर्यटकांच्या सहाय्याने घटना स्थळी पाहणी केली. मात्र खोल डोह आल्याने मृतदेहाच थांग पत्ता लागला नाही. मात्र मृतदेह बाहेर काढण्यासाठी अन्य आपतकालीन यंत्रणेची मदत घेतली जाईल असे पोलीस निरीकक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती असजीकी धारवाड येथील काही युवक गुरुवारी सकाळी दुचाकींवरून पर्यटनासाठी विर्डीकडे रवाना झाले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते विर्डीत पोहोचले. वझर सखल धबधब्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी त्यांनी डोंगरमाथ्यावरील परिसर गाठला. धबधबा पाहून तातडीने परतण्याचा त्यांचा विचार होता. मात्र उंच कड्यावरून कोसळणारे पाणी आणि खाली निर्माण झालेले नितळ पाण्याचे कुंड पाहून काही युवकांनी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला.
यावेळी विजय दोडमणी पोहत असताना अचानक पाण्यात अदृश्य झाला. तो नेमका कशा परिस्थितीत बुडाला? याबाबत कोणालाही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. काही वेळाने तो दिसेनासा झाल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आणि तेथे उपस्थित असलेल्या अन्य पर्यटकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल वसंत देसाई, बाळकृष्ण धर्णे, पोलीस नाईक मानसी गावडे तसेच पोलीस शिपाई अभिजित कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र कुंडाची खोली आणि संध्याकाळच्या वाढत्या अंधारामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
कुंडाची खोलीच ठरते धोकादायक
वझर धबधब्याखाली तयार झालेले जलकुंड परिसरातील सर्वाधिक खोल कुंडांपैकी एक मानले जाते. त्याची नेमकी खोली किती आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र ग्रामस्थांच्या अंदाजानुसार ती बारा माडांहून अधिक असावी. त्यामुळे या ठिकाणी पोहणे किंवा पाण्यात उतरणे अत्यंत जोखमीचे मानले जाते.
शोधकार्य आणखी वाढविणार
घटनेनंतर सुरू करण्यात आलेली शोधमोहीम पुढील टप्प्यात अधिक व्यापक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली. कुंडाची खोली आणि पाण्याचा वेग लक्षात घेता आवश्यक त्या यंत्रणांची मदत घेतली जाणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. विजयच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून ते दोडामार्गकडे रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.
चौदा वर्षांपूर्वीची घटना पुन्हा चर्चेत
वझर धबधब्याशी संबंधित अशी दुर्घटना प्रथमच घडलेली नाही. १८ नोव्हेंबर २०१२ रोजी गावातील एका युवकाचा याच कुंडात बुडून मृत्यू झाला होता. त्यावेळी अनेक दिवस शोधमोहीम राबविण्यात आली होती. सातारा येथील पाणबुडींचीही मदत घेण्यात आली होती; मात्र मृतदेह सापडला नव्हता. अखेर सहाव्या दिवशी तो पाण्यावर तरंगून आढळला होता. या घटनेची आठवण आजही ग्रामस्थांच्या मनात कायम असून गुरुवारी घडलेल्या दुर्घटनेमुळे त्या जुन्या जखमा पुन्हा उघडल्या गेल्या आहेत. ती घटना व आजच्या घटनेत १८ तारीख आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पर्यटकांना खबरदारीचे आवाहन
पावसाळ्यात वझर धबधबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो. मात्र खोल जलकुंड, घसरडे दगड आणि अनिश्चित पाण्याचा प्रवाह यामुळे हा परिसर धोकादायक ठरतो. त्यामुळे अशा ठिकाणी आंघोळ किंवा पोहण्याचा मोह टाळावा, असे आवाहन प्रशासन आणि ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
फिरायला जायचे ठरवले होते ; मात्र नेमके कुठे जायचे हे निश्चित नव्हते. इंस्टाग्रामवर विर्डी धबधब्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतर येथे येण्याचा निर्णय घेतला. मात्र अशी दुर्दैवी घटना घडेल, याची कल्पनाही नव्हती, अशी भावना विजयचा मित्र मल्लिकार्जुन अंपनहाळ याने व्यक्त केली. विजय दोडमणी याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.










