
सिंधुदुर्गनगरी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी १ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी ओरोस येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पक्षाच्या बैठकीत त्यांनी तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे व्यवसाय व उद्योग उभारून उद्योजक बनावे, असे आवाहन केले .
जिल्हाध्यक्ष अजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून पक्ष नेतृत्वाचा आदेश मानत संघटनात्मक कामाला प्राधान्य द्यावे. पक्षाची सदस्य नोंदणी व जुन्या सदस्यांचे नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करून संघटना अधिक मजबूत करावी, अशा सूचना मोरे यांनी दिल्या.
समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी समाजकल्याण आयुक्तांशी संपर्क साधून नवीन योजनांची माहिती मिळवावी आणि योजनांची प्रभावी जनजागृती तळागाळातील नागरिकांपर्यंत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची तसेच सत्तेतील पक्षाच्या हक्काच्या वाट्याबाबत अद्याप योग्य निर्णय झालेला नसल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या मनातील ही खदखद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासमोर प्रत्यक्ष भेटीत मांडणार असल्याचे प्रकाश मोरे यांनी सांगितले.
तसेच रामदास आठवले साहेबांची लवकरच वेळ घेऊन त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार असून, त्यादृष्टीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष अजित कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व कामांची यादी प्रदेश अध्यक्षांसमोर मांडली.
या बैठकीला जिल्हा कोषाध्यक्ष आनंद पेंडुरकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, कुडाळ तालुकाध्यक्ष सतीश कदम, मालवण तालुकाध्यक्ष दीपक वराडकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र जंगम, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








