
कणकवली : कणकवली शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोर उभारण्यात येत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या कार्यालयाच्या सुरू असलेल्या कामाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार प्रमोद जठार यांनी पाहणी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत देखील उपस्थित होते.
भाजपच्या जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने कणकवली येथे जिल्हास्तरीय कार्यालय उभारण्यात येत आहे. या कार्यालयातून पक्षाच्या विविध संघटनात्मक बैठका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद तसेच जिल्ह्यातील पक्षाच्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.
नवीन कार्यालयाच्या इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून सध्या अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. कार्यालयातील विविध सुविधा, अंतर्गत कामे तसेच उर्वरित कामांची यावेळी पाहणी करण्यात आली. कामाची प्रगती आणि पूर्णत्वासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती संबंधितांकडून घेण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार प्रमोद जठार यांनी इमारतीच्या विविध भागांची पाहणी करून कामाबाबत आढावा घेतला. जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हे कार्यालय पक्षासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम व बैठकांचे नियोजन करण्यात येणार असून, त्यासाठी या नवीन जिल्हा कार्यालयाचा उपयोग होणार आहे. कार्यालयाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.










