
कणकवली : महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. देश व राज्यातील शिवसैनिकाला लोकप्रतिनिधी करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. शिवसैनिकाला पद आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महान कार्य बाळासाहेब ठाकरे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी काळात ठाकरे शिवसेनेतर्फे भगवा सप्ताह आयोजित केला जाणार आहे. या सप्ताहाअंतर्गत शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांनी तळागळापर्यंत जाऊन जनतेचे प्रश्न व समस्या समजून घेत पक्षाचे संघटन मजबूत करावे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
हिंदूहृदयसम्राट तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवलीतील ठाकरे शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी श्री. नाईक बोलत होते. यावेळी ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधासभाप्रमुख तथा कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, तालुकाप्रमुख राजू राठोड, डॉ. प्रथमेश सावंत, महिला आघाडीप्रमुख मधुरा पालव, तालुका संघटक वैदेही गुडेकर, कळसुली विभागप्रमुख चंद्रहास उर्फ बबली राणे, रुपेश आमडोसकर, राजू राणे, ॲड. हर्षद गावडे, दया मेस्त्री, लवू पवार, सुरेंद्र पाटकर, दिवाकर पारकर, आनंद म्हाडेश्वर, ओमप्रकाश ताम्हाणेकर, शोबा बागवे, दिव्या साळगावकर, रवींद्र खंदारे, महादेव राठवड, संतोष राणे,प्रकाश शिंदे, आप्पा तावडे, तात्या निकम, अनिल नरे, आत्माराम घाडी, गोपाळ लोके, गुरु पेडणेकर, रोहित राणे, तेजस राणे, नरेश दळवी, संतोष तेली, चंदू परब, मोहन तांबे, सिद्धेश राणे, ललित घाडीगावकर आदी उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले, बदल्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेची अनेकांनी साथ सोडली. परंतु जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत, तोपर्यंत शिवसेनेचे अस्तित्व अबाधित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांनी शिवसेनेची साथ सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे संघटना नेटवर्क कमी झाले आहे. संकट व आव्हानांच्या काळातही शिवसेनेचे अस्तित्व अबाधित कसे ठेवायचे असते, याची शिकवण बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिली आहे. त्यामुळे सत्ता असो वा नसो शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी शिवसैनिक तन, मन, धनाने सज्ज आहेत.
राज्यात शिवसेनेची सत्ता होती, त्यावेळी जिल्ह्यातील इतर पक्षांतील नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत आले. त्यानंतर शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर त्यांनी पुन्हा सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला. परंतु सत्ता नसतानाही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांवर ठाम राहिला आणि शिवसेनेची साथ सोडली नाही, याबद्दल निष्ठावान शिवसैनिकांचा अभिमान आहे.
सत्ता नसतानाही जे शिवसैनिक बाळासाहेबांची शिवसेना मजबूत करण्याठी अहोरात्र मेहनत घेतात, त्यांचा बाळासाहेबांवर हक्क आहे. बाळासाहेबांचा फोटो लावून त्यांची जयंती व स्मृतीदिन साजरा करतील, परंतु ते बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीत, असा टोला त्यांनी शिवसेनेची साथ सोडलेल्यांना लगावला.
शिवसैनिक हे बाळसाहेबांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा बाल्लेकिला बनविण्यासाठी शिवसैनिकांनी तळगाळापर्यंत जावून जनतेशी कनेक्ट होऊन त्यांचे प्रश्न व समस्या समजून घेत त्यांच्या प्रश्न व समस्यांबाबत आवाज उठवावा, असे आवाहन नाईक यांनी केले.
कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे म्हणून पक्षाला अच्छे दिन येणार असे नाही, तर कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्न व समस्याबाबत आवाज उठवला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सुशांत नाईक म्हणाले, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली तालुक्यात ठाकरे शिवसेनेतर्फे भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यातील सर्व गावांमध्ये ठाकरे शिवसेनेचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी तालुकाप्रमुख व विभागाप्रमुखांना घेऊन गावनिहाय दौरे करतील. त्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी दौरे करणार आहेत. त्यानंतर कणकवली तालुक्यातील शिवसैनिकांचा मोठा मेळावा घेण्याचा आमचा संकल्प आहे. गाव तिथे शिवसेना, शिवसेना तिथे गाव निर्माण करणे, हेच बाळासाहेबांना खरे अभिवादन ठरेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मधुरा पालव यांनी बाळासाहेबांना अभिवादन करून उपस्थितांना पक्ष संघटना वाढीबाबत मार्गदर्शन केले. तत्पूर्वी शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अमर रहे, अमर रहे बाळासाहेब अमर रहे, अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी शिवसैनिक मोठ्याा संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी
View all









