LIVE UPDATES

झाडी-झुडपांत हरवला कुसूर-कुंभारी रस्ता

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 07:18 PM
views 100  views

वैभववाडी : रस्ता आहे की झाडी-झुडपांचे जंगल, असा प्रश्न पडावा अशी अवस्था वैभववाडी तालुक्यातील कुसूर-कुंभारी रस्त्याची झाली आहे. सुमारे दोन किलोमीटर लांबीचा हा रस्ता दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झाडाझुडपांनी पूर्णपणे वेढला गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेत प्रवास करावा लागत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने वाढलेल्या झुडपांमुळे प्राण्यांच्या हल्ल्याचा अथवा अचानक वाहनांसमोर येण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

कुसूर-कुंभारी मार्ग हा परिसरातील ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडाझुडपांनी रस्त्याचा मोठा भाग व्यापला आहे. काही ठिकाणी झुडपे थेट रस्त्यावर आली असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. वळणांवर तर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. झुडपांमध्ये लपलेले वन्यप्राणी अचानक रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी ही परिस्थिती विशेष चिंताजनक आहे.

 रस्त्याच्या या दयनीय अवस्थेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार कैफियत मांडली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे तातडीने हटवून मार्ग मोकळा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. मात्र, अद्याप याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. संभाव्य अपघात आणि वन्यप्राण्यांचा धोका लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने झाडाझुडपांची साफसफाई करून कुसूर-कुंभारी रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.