LIVE UPDATES

मालवणी खाद्य संस्कृतीचा महिला बचत गटांनी ब्रँड तयार करावा

नगराध्यक्ष संदेश पारकर : हिरकणी लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 08, 2026 13:12 PM
views 71  views

कणकवली : मालवणी खाद्य संस्कृतीतील पारंपरिक पदार्थांना व्यावसायिक स्वरूप देऊन महिला बचत गटांनी स्वतःचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करावा आणि त्या माध्यमातून आपले खाद्यपदार्थ मार्केटमध्ये उपलब्ध करावेत जेणेकरून त्यांना चांगला दर मिळेल आणि त्याची व्याप्ती देखील वाढेल आणि महिला बचत गटांची आर्थिक उन्नती होईल असे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र, कणकवली यांच्या १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनप्रसंगी  बोलताना सांगितले

महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या हिरकणी लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, पंचायत समिती सभापती हर्षवर्धन वाळके, पंचायत समिती सदस्य बाबलू सावंत तसेच तालुक्यातील महिला उद्योजिका आणि बचत गटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमात महिला सक्षमीकरणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक श्रीमती मिरशी गेंडे यांनी उद्योग विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक अर्जुन सर यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या बँकिंग व कर्ज योजनांची माहिती दिली. तसेच तालुका कृषी अधिकारी विनायक पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

सभेत बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बचत गटांचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी तयार केलेल्या मालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मालवणी खाद्य संस्कृतीतील पारंपरिक पदार्थांना आधुनिक विपणनाची जोड देऊन त्यांचा स्वतंत्र ब्रँड विकसित केल्यास महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळू शकते अशी भावना देखील पारकर यांनी व्यक्त केली