
सिंधुदुर्गनगरी : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीसाठा वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात किमान १० हजार कच्चे व वनराई स्वरूपाचे बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्याचबरोबर जिल्ह्यातील अस्तित्वातील पक्के, कोल्हापूर टाईप तसेच अन्य बंधाऱ्यांचे दृढीकरण करून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तुकाराम तथा दादा साईल यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी दीक्षांत कोळप, कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे, पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. रविंद्र दळवी आदी उपस्थित होते. यासाठी २८ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पुढील दोन-तीन दिवसांत पंचनाम्याचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. लवकरात लवकर १०० टक्के पंचनामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
काही ठिकाणी तांत्रिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे पंचनाम्याच्या कामात अडथळे येत असले तरी ते दूर करून कामाला गती देण्यात आली आहे. प्रत्येक महसुली गावासाठी पंचनामे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हास्तरावर तसेच विभागीय स्तरावरही या अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
कृषी, पशुसंवर्धन विभागही बंधारा मोहिमेत सहभागी
संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागानेही बंधारे उभारणीच्या मोहिमेत सहभाग घेतला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सुमारे १०० बंधारे, तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागासह सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून सुमारे १५० बंधारे स्वतंत्रपणे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे बंधारे येत्या १० तारखेपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
लोकसहभाग, स्थानिक नागरिकांचे सहकार्य तसेच उपलब्ध जागेनुसार पक्के, वनराई आणि कच्चे बंधारे उभारून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत सर्वाधिक परिणाम कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रावर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून आतापासूनच पूर्वतयारी करण्यात येत आहे.
कमी पाण्यातील पिकांसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
आगामी हंगामात कमी पाण्यावर घेता येणारी किंवा पाण्याची अत्यल्प गरज असलेली पिके कोणती, याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कृषिशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे तांत्रिक मार्गदर्शन घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांना पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी यासाठीही नियोजन सुरू आहे. कमी पाण्यात घेता येणाऱ्या चारा पिकांची लागवड, तसेच सुक्या चाऱ्याची साठवणूक कशा पद्धतीने करता येईल, याबाबतही उपाययोजना करण्यात येत आहेत. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यात जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
१० हजार बंधाऱ्यांपैकी ८५९ बंधारे पूर्ण
जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या १० हजार बंधाऱ्यांच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत लोकसहभागातून सुमारे ८५९ बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित उद्दिष्टही वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
जलतारा खड्ड्यांद्वारे भूजलपातळी वाढविण्याचे नियोजन
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून वनराईच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जवळच्या जलस्रोतांना त्याचा फायदा मिळावा, यासाठी जलतारा खड्डे उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेकडून १० हजार ८२५ जलतारा खड्ड्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत २३६ खड्डे पूर्ण झाले आहेत. उर्वरित उद्दिष्ट येत्या १० ते १२ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जलसंधारण, कृषी नियोजन आणि पशुधनासाठी चारा उपलब्धता या तिन्ही आघाड्यांवर प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून, लोकसहभागातून या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.










