LIVE UPDATES

घोटगे खालचीवाडी येथे विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 27, 2026 21:14 PM
views 246  views

दोडामार्ग : घोटगे खालचीवाडी येथील एका महिलेचा विहिरीत मृतदेह आढळून आला. समीक्षा सहदेव दळवी वय 45 असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, घोटगे खालचीवाडी येथे राहणारी समीक्षा दळवी यांचे पती सहदेव दळवी हे नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळी मोलमजूरी करण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. दुपारी सहदेव घरी आले असता त्यांना त्यांची पत्नी समीक्षा ही घरात न दिसल्याने त्यांनी समीक्षा यांचा सर्वत्र शोध घेतला.

समीक्षा या लगतच्या ओहोळात नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी तर गेल्या नसतील ना म्हणून तेथेही त्यांचा शोध घेतला. मात्र त्या सापडल्या नाही. पाणी आणण्यासाठी त्या बहुधा विहिरीवर गेल्या असतील म्हणून तेथे जाऊन पाहिले असता विहिरीलगत चप्पल व छत्री आढळून आली. या वस्तू समीक्षा यांच्या असल्याचे लक्षात येतात सहदेव यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना त्यांच्या पत्नीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.