LIVE UPDATES

वनविभागाचा 'हत्ती'छाप कारभार!

"हत्ती मारतो तर मारू दे!" रक्षकच बनला 'भक्षक'? वनरक्षकाचे अजब वक्तव्य; ग्रामस्‍थ संतप्‍त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 27, 2026 20:29 PM
views 620  views

दोडामार्ग : दोडामार्ग-बांदा रस्त्यावर मोरगाव येथे धुमाकूळ घालणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीपासून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला असताना, त्याला नियंत्रणात आणण्याऐवजी कर्तव्यावर असलेल्या वनरक्षकांनीच कथितरीत्या “हत्ती कोणाला मारतो तर मारू दे, गाडी फोडतो तर फोडू दे. आपल्याला काही फरक पडत नाही,” असे  बेजबाबदार वक्तव्य करत गस्तीवर असलेल्या हाकारी टीमला गाडीत बसवून दोडामार्गला निघून गेल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला.

यावेळी संतापलेले ग्रामस्थ म्हणाले की, हत्ती रस्त्यावर, दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा आणि पाहण्यासाठी जमलेली गर्दी अशी धोकादायक परिस्थिती असताना घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघून जाणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी संबंधित वनरक्षकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी गेले असता ते प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेले.

दरम्याम, घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित वनरक्षकावर तातडीने कारवाई करून या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी करत संताप व्यक्त केला. मंगळवारी रात्री फोंडिये येथे ‘ओंकार’ हत्तीने एका कारवर हल्ला केला होता. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना अगदी ताजी असताना ओंकार हत्तीचा वावर अधिकच चिंतेचा विषय बनला असून, तो राज्य मार्गासह परिसरातील विविध प्रमुख रस्त्यांवर फिरत असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ‘ओंकार’ मोरगाव-हातीकडे रस्त्यावर आल्याची माहिती परिसरात पसरताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. हत्ती रस्त्यावर असल्याने काही काळातच दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी झाली.

अशा परिस्थितीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने गर्दी हटवून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवणे आणि हत्तीला रस्त्यावरून जंगलाच्या दिशेने वळविणे अपेक्षित होते. यावेळी वनरक्षक हे कर्तव्यावर असल्याचे सांगण्यात येते. मात्र, उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हत्तीला सुरक्षितपणे जंगलात हाकलण्याबाबत उपाययोजना करण्याऐवजी त्यांनी अत्यंत असंवेदनशील वक्तव्य केले. हत्ती एखाद्याला इजा करतो किंवा वाहनाचे नुकसान करतो, तरी त्याची आपल्याला पर्वा नसल्याच्या आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तक्रार करायची असल्यास खुशाल करावी, असेही त्यांनी म्हटल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वनरक्षकाच्या या कथित वक्तव्यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला. विशेष म्हणजे, हत्ती त्यावेळी रस्त्यावरच उभा होता. त्याच्या आजूबाजूला नागरिकांची गर्दी आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे हत्ती बिथरल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

हत्ती रस्त्यावर अन् वन कर्मचारी निघून गेले!

परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी संबंधित वनरक्षक अन्य वन कर्मचाऱ्यांसह तेथून निघून गेले. हत्ती रस्त्यावर असताना आणि नागरिकांची गर्दी कायम असताना कर्मचारी घटनास्थळावरून निघून गेल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गर्दी नियंत्रणात ठेवणे, वाहतूक सुरळीत करणे आणि परिस्थितीनुसार हत्तीला सुरक्षित दिशेने वळविण्याची जबाबदारी असते. त्यामुळे हत्ती घटनास्थळी असतानाच वन कर्मचाऱ्यांनी तेथून निघून जाणे हा गंभीर प्रकार असल्याने याबाबत संताप व्यक्त होत आहे.