LIVE UPDATES

दर्याराजाच्या चरणी श्री देव रामेश्वराचा ‘मानाचा सोन्याचा नारळ’!

मिठबावच्या नारळी पौर्णिमेला श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम; गजबादेवी सागरतीर्थावर भक्तिमय सोहळा
Edited by:
Published on: August 27, 2026 21:06 PM
views 191  views

देवगड : मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. प्राचीन परंपरेपासून चालत आलेली ही रूढी गावातील गावघर रयत आजही त्याच उमेदीने आणि उत्साहाने जपत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. नारळी पौर्णिमेनिमित्त श्री देव रामेश्वराचा मानाचा सोन्याचा नारळ श्री गजबादेवी सागरतीर्थाला अर्पण करण्यात आला.

मिठबाव, तांबळडेग आणि कातवण या तिन्ही गावांतील गावघर रयत मोठ्या संख्येने श्री देव रामेश्वर मंदिरात एकत्र आली. दुपारी तीन वाजता मंदिरात विधिवत धार्मिक विधींना सुरुवात झाली. मानाच्या सोन्याच्या नारळाची विशेष पूजा करण्यात आली. तसेच मंदिरातील सर्व देवतांना पोवती (राखी) अर्पण करून धार्मिक विधी पार पाडण्यात आले.

यानंतर चार वाजता श्री देव रामेश्वराचा आशीर्वाद घेऊन मानाचे सोन्याचा श्रीफळ   ढोल-ताशांच्या गजरात आणि श्री देव रामेश्वराच्या जयघोषात गावघर रयतेची मिरवणूक गजबादेवी सागरतिर्थाच्या  दिशेने मार्गस्थ झाली.

पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.या सोहळ्यात तिन्ही गावांतील ग्रामस्थांसह अनेक व्यापारी बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्री गजबादेवी  सागरतीर्थावर पोहोचल्यानंतर विधिवत पूजन करून श्री देव रामेश्वराचा मानाचा सोन्याचा नारळ दर्याराजाला अर्पण करण्यात आला. नारळ अर्पण करताना उपस्थितांनी श्री देव रामेश्वराचा जयघोष केला.

गावघर रयत, ग्रामस्थ, व्यापारी बांधव आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नारळी पौर्णिमेचा हा सोहळा विशेष रंगतदार ठरला. श्रद्धा, गावाची एकजूट आणि पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक रूढींचे जतन करणारा हा उत्सव भक्तिभावाने संपन्न झाला.