LIVE UPDATES

अपघात झाल्यावरच खड्डे बुजवणार का?

सभापती सिद्धेश रावराणे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला सवाल
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 17:33 PM
views 20  views

वैभववाडी : फोंडा–उंबर्डे मार्गावरील खड्डे भरताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून, भरपावसात काँक्रीटने खड्डे बुजविण्याचा प्रकार होत आहे. अशा पद्धतीने केलेले काम किती दिवस टिकणार? उर्वरित रस्त्यांवरील खड्डे अपघात झाल्यानंतरच बुजविणार का, असा संतप्त सवाल करत पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

  पंचायत समितीची मासिक सभा सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला.मागील सभेत फोंडा–उंबर्डे मार्गावरील खड्डे पावसाळी डांबराने बुजविण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भरपावसात काँक्रीट टाकून खड्डे भरले जात असल्याचे निदर्शनास आले. काँक्रीटमध्ये सिमेंटचे प्रमाण कमी आणि दगडी ग्रीटचे प्रमाण अधिक असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप सभापती रावराणे यांनी केला.यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम योग्य पद्धतीने सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, या स्पष्टीकरणावर समाधान न मानता सभापती रावराणे यांनी सभा संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्याचा निर्णय जाहीर केला. काम दर्जाहीन आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का, असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना करत त्यांना कोंडीत पकडले.याचबरोबर, फोंडा–उंबर्डे मार्गावरील निकृष्ट कामाचा मुद्दा खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 'दिशा' समितीच्या बैठकीत मांडण्याचे निर्देशही सभापती रावराणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.