LIVE UPDATES

एसआयआर अंतर्गत नोटीस मिळालेल्या मतदारांनी सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 24, 2026 20:01 PM
views 20  views

सिंधुदुर्गनगरी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत प्राप्त दावे व हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी यांच्या स्तरावर सुरू करण्यात आली आहे.

ज्या मतदारांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये दाखल झालेले नाही अशा मतदारांना नियमानुसार सुनावणीच्या लेखी नोटिसा बजावण्यात येत आहेत. ज्या मतदारांना अशा प्रकारची सुनावणीची नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी नोटीसमध्ये नमूद केलेल्या दिनांकास व वेळेत दिलेल्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहावे.

मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीरहित बनवणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. मतदारांनी आपली बाजू मांडण्यासाठी व मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिंधुदुर्ग तृप्ती धोडमिसे यांचेकडून करण्यात येत आहे.