
पणदूर : ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुरुवारी सायंकाळी डिगस व घोडगे दशक्रोशीतील अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
डिगस, पणदूर, अणाव, हुमरमळा, आवळेगाव, कडावल, भडगाव, घोडगे, भरणी, कुपवडे, जांभवडे, आंब्रड, हिर्लोक, कुसगाव आदी परिसरातील घरगुती गणपतींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. बाप्पांच्या विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या.
ढोल-ताशांच्या गजरात आणि बाप्पाच्या जयघोषात मिरवणुका विसर्जनस्थळी पोहोचल्या. त्यानंतर सामूहिक आरती करून ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. परिसरातील तलाव, नदी तसेच ओहोळांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.











