
कुडाळ : तालुक्यात अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडले. शहरासह ग्रामीण भागातील विविध गणेश मंडळे व घरगुती गणेशभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप दिला. यंदा अनंत चतुर्दशी बाराव्या दिवशी येत असली तरी अनेक भक्तांनी अकराव्या दिवशीचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिल्याने शहरातील विसर्जनस्थळांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील प्रमुख गणेश घाटांवर पोलीस प्रशासनाकडून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. भाविकांची गर्दी, मिरवणुका आणि नदीपात्रातील सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याने शहरातील विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.
कुडाळ शहरातील भंगसाळ नदीपात्रात मगरीचा वावर असल्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. यासाठी वनविभागाने भंगसाळ गणेश घाटावर वनकर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक कार्यरत ठेवले होते. भाविकांना नदीपात्रात सुरक्षित अंतर राखण्याबाबत वन पथकाकडून सतत सूचना दिल्या जात होत्या.
शहरातील नदीपात्रात विसर्जनासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शहरी भागात कोणतीही अडचण आली नाही. मात्र, ग्रामीण भागातील अनेक ओढ्यांमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने काही गावांमध्ये विसर्जनासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे गणेशभक्तांना मुबलक पाण्याचा साठा असलेल्या इतर ठिकाणांचा शोध घेऊन गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले.
यंदा कुडाळ तालुक्यात गणेशोत्सव निर्विघ्न पार पडला असला तरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. ओढे-नाले कोरडे पडू लागल्याने शेतीवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे गणरायाला निरोप देताना "यंदाचे पावसाचे विघ्न दूर कर, शेतीला आवश्यक पाऊस पडू दे आणि बळीराजाला संकटातून वाचव," असे साकडे शेतकऱ्यांनी गणरायाच्या चरणी घातले.











